युवक काँग्रेसने तळले बस स्थानकावर भजी, लोणार येथे राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा
By ब्रह्मानंद जाधव | Published: September 17, 2023 04:12 PM2023-09-17T16:12:45+5:302023-09-17T16:14:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवक काँग्रेसने हे अनोखे आंदोलन केले.
लोणार : येथील बस स्थानकामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने भजे काढून १७ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवक काँग्रेसने हे अनोखे आंदोलन केले.
जिल्हा युवक काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस लोणार येथे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिकेत मापारी यांच्या उपस्थितीमध्ये बस स्थानकासमोर भजे काढून राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे, शहर अध्यक्ष शेख समद, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास मोरे, भरत राठोड व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अनिकेत मापारी यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना, कोरोना संकटामुळे त्यात आणखी भर पडली. या सर्व परिस्थितीमध्ये देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. नरेंद्र मोदी जेव्हा या देशाचे पंतप्रधान झाले, त्यावेळी त्यांनी या देशातील लाखो बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्याचे आश्वासन दिले होते. मोदीजींनी पंतप्रधान पदाची नऊ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, तरीही देशातील बेरोजगारी काही कमी झालेली नाही, असा आरोप यावेळी जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अनिकेत मापारी यांनी केला. त्या निमित्त आज राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला.