लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : दिल्ली येथील एका प्रार्थना स्थळावरून आलेल्या आणि क्वारंटाईन असलेल्या सहाही जणांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. दिल्ली येथील एका प्रार्थना स्थळावरून आलेल्या सहा जणांना शेगाव येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. यामध्ये बोडखा, काकनवाडा, संग्रामपूर येथील प्रत्येकी दोन यक्तीचा समावेश आहे. क्वारंटाईन असलेल्या नागरिकांची प्रकृती ठणठणीत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी मयूर वाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दिल्ली येथील एका धार्मिक कार्यक्रमात संग्रामपूर तालुक्यातील सहाही जण सहभागी झाले होते. तालुका प्रशासनाने दोन दिवस अगोदर शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्वांना पाठवले होते. रुग्णालयात स्वाब नमुने घेण्यात आले. तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. एक दोन दिवसात त्यांचा अहवाल येणार असल्याचे आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे. सध्या स्थिती शेगाव येथे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)