बुलढाणा : छत्तीसगडमधील रायपूर येथे होत असलेल्या ३३ व्या वेस्ट झोन राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत बुलढाण्याच्या नयन सरडेने ११० मीटर अडथळा शर्यतीत १४.४७ अशी वेळ नोंदवत सुवर्ण पदकावर ११ सप्टेंबर रोजी नाव कोरले. यापूर्वी मुंबईत १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत ११० मीटर अडथळा शर्यतीत त्याने रजत पदकाची कमाई केली होती.
ॲथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने ९ सप्टेंबर पासून ही स्पर्धा सुरू असून ११ सप्टेंबर रोजी या स्पर्धेचा समारोप होणारआहे. सोमवारी या स्पर्धेत ११० मीटर अडथळा शर्यतीच्या प्रकारात नयन प्रदीप सरडेने १४.४७ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. दरम्यान राजस्थानच्या ॲथलिट्सने १५.३६ सेकंदाची वेळ घेत रजत तर गुजरातच्या ॲथलिट्सने १५.६९ सेकंद वेळ घेत कांस्यपदका कमाई केली. राजस्थान व गुजरातच्या या दोन्ही खेळाडूंचे अडथळा शर्यतीतील आव्हान मोडून काढत नयन सरडेने ही कामगरी करत बुलढाण्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. आपल्या यशाचे श्रेय तो राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, राज्य ॲथेलिटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष गोपालसिंग राजपूत, क्रीडा प्रशिक्षक गणेश जाधव, विजय वानखेडे , राजेश डिडोळकर, समाधान टेकाडे, दीपक जाधव व आईवडिलांना देतो.
नागपूर येथील समशेर खान यांच्या मार्गदर्शनात तो सराव करतो. ऐशियन गेम्ससाठी पात्रता चाचणी देणार गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय स्पर्देत ११० मीटर अडथळा शर्यतीत नयनने रजत पदक पटकावत रायपूर येथील स्पर्धेसोबतच गोवाहाटी येथील राष्ट्रीय स्पर्धा आणि भोपाळ येथे १५ सप्टेंबर नंतर होणाऱ्या ऐशियन गेम्ससाठीच्या निवड चाचणीसाठी पात्र ठरला होता. आता रायपूर येथील स्पर्धेत सुवर्ण पदक त्याने पटकावल्याने त्याचा आत्मविश्वास वाढल्याने भोपाळ येथील निवड चाचणी व गोवाहाटी येथे होणाऱ्या स्पर्धेतील त्याच्या कामगिरीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून रहाले आहे. नयन सरडे हा सध्या नागपूर येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सराव करत असून बुलढाणा जिल्ह्याचे तो नेतृत्व करतो.