बुलढाणा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याच्या शरद पवार यांच्या निर्णयामुळे बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही खळबळ उडाली असून शरद पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची कल्पनाच करता येत नाही, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविला आहे.
दरम्यान आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्तेही त्यांच्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे सामुहिक राजीनामे देत असल्याचे ॲड. काझी यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी त्यांच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असेही काझी म्हणाले.दरम्यान माजी मंत्री तथा विद्यमान आ. डॉ. राजेंद्र शिंगणे हेही अनुषंगीक वृत्त ऐकताच मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
‘शरद पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची कल्पनाच आम्ही करू शकत नाही. त्यांच्या या निर्णयामुळे वेदना व दु:ख होत आहे. तेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हवेत. १९९९ मध्ये त्यांच्या केवळ सूचनेवरून काँग्रेस सोडून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालो होतो. तेव्हाच अन्य पक्षांची दोर आपण कापून टाकली होती. साहेबांनीच अध्यक्ष म्हणून रहावे ही आमची सर्वांची इच्छा आहे’, असेही डॉ. शिंगणे यावेळी म्हणाले.