बुलडाणा : बुलडाणा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कर्जमुक्तीसाठी शेतकरी स्वाक्षरी अभियान राबविले जात असून, २२ मार्च रोजी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अँड.नाझेर काझी, माजी आमदार रेखाताई खेडेकर, ज्येष्ठ नेते राधेश्याम चांडक, विधानसभा अध्यक्ष नरेश शेळके, सुमीत सरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत खूपगाव येथून सुरुवात करण्यात आली. सतत तीन वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यावर्षीसुद्धा उत्पादन झाले नाही. लागवडीचा खर्च मात्र वाढतच गेला. त्यामुळे शेतकर्यांवर कर्जाचा डोंगर झाला. घर चालविणे कठीण झाले. लेकराबाळांचे होणारे हाल सहन न झाल्याने अनेक शेतकर्यांमध्ये नैराश्य निर्माण होऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. अशातच आत्ताच जाहीर झालेल्या बजेटमध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्यांना कर्जमाफी होईल, अशी आशा होती, परंतु सरकारने कर्जमाफी दिली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. अशा शेतकर्यांना दिलासा देऊन न्यायालयीन व आंदोलनात्मक मार्गाने लढा देण्याच्या दृष्टीने सदर अभियानाचे आयोजन नरेश शेळके यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने, शहर अध्यक्ष दत्ता काकस यांनी केले आहे. सदर अभियानादरम्यान तालुक्यातील गावागावांत जाऊन शेतकर्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी घेतली जात असून, तालुक्यातील २५ ते ३0 हजार शेतकर्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहचविले जाणार आहे.
कर्जमुक्तीसाठी राष्ट्रवादीचे शेतकरी स्वाक्षरी अभियान
By admin | Published: March 24, 2016 2:51 AM