- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना लाॅकडाऊन काळात शाळा बंद असल्याने ऑनलाइन वर्ग मोबाइलद्वारे सुरू झाले. त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे आता हाडांच्या डाॅक्टरकडे वाढलेल्या रुग्णसंख्येतून पुढे येत आहे. खामगाव शहरातील हाडांच्या तज्ज्ञ डाॅक्टरांकडे दैनंदिन येणाऱ्या रुग्णांपैकी १० टक्के विद्यार्थी आहेत. त्यांना मान व पाठदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत, असे शहरातील अस्थिरोग तज्ज्ञ डाॅ. भगतसिंग राजपूत यांनी सांगितले. लाॅकडाऊनच्या काळात शाळांचे वर्ग ऑनलाइन सुरू झाले. मोबाइलद्वारे वर्गात सहभागी होताना विद्यार्थ्यांना तासन्तास समोर बसून राहावे लागते. अनेक विद्यार्थ्यांकडे बसण्यासाठी पुरेसी किंवा आरामदायक बैठक व्यवस्था नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थी मोबाइलसमोर पाठ वाकवून बसतात. त्याच अवस्थेत तासन्तास बसल्याने पाठदुखीचा त्रास वाढत आहे, तसेच हाडे ठिसूळ होऊ शकतात. तर मोबाइल स्टॅण्डवर न ठेवता कोणत्याही स्थितीत ठेवून त्यासमोर मान झुकवल्याने मानेचाही त्रास वाढत आहे. काही विद्यार्थी मांडी घालून बसतात. परिणामी, दोन्ही पायात मुंग्या येणे, नसा दबण्याची शक्यताही डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे, तर हा प्रकार सतत सुरू राहिल्यास भविष्यात कुबडे निघण्याचा त्रासही होऊ शकतेा, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
प्रतिबंधासाठी उपाय
- मोबाइल स्टॅण्डवर ठेवा.
- मैदानात खेळणे, व्यायाम, प्राणायाम करावा.
- बसण्याची पद्धत सुधारावी.
- पाठ सरळ ठेवावी.
- भाज्या, फळांचा आहारात समावेश करा.
दैनंदिन तपासणीसाठी बाह्यरुग्ण विभागात १० टक्के विद्यार्थी येत आहेत. त्यांना प्रामुख्याने पाठ व मानदुखीचा त्रास आहे. त्यांच्यावर हाेणारे परिणाम पाहता पालकांनी ऑनलाइन मोबाइल वर्गाबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. - डाॅ. भगतसिंह राजपूतअस्थिरोग तज्ज्ञ, खामगाव.