डिसेंबर २०१९ मध्ये टीपेश्वर अभयारण्यात टी१ सी१ हा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात आला होता. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्य वाघांच्या अधिवासासाठी उपयुक्त आहे किंवा नाही, यासंदर्भात बारकाईने निरीक्षणे नोंदविण्यात आली होती. त्यामुळे टायगर कॉरिडॉरला चालना मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ज्ञानगंगा अभयारण्यात प्रति चौरस कि.मी. १८.२३ तृणभक्षी प्राणी असल्याने वाघांसाठीचे खाद्य येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी वाघांच्या अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्य उपयुक्त असल्याबाबत तज्ज्ञांचे एकमत झाले होते. मात्र, २० वाघांच्या रहिवासासाठी ८०० ते १०० चौ. कि.मी. क्षेत्र आवश्यक असते. त्यामुळे भविष्यात या पट्ट्यात वाघांचे नैसर्गिकरीत्या स्थलांतर झाल्यास त्यासाठी एक कॉरिडॉर असावे या दृष्टिकोनातून ज्ञानगंगा अभयारण्याच्या विस्तारासंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुषंगाने बुलडाणा, मोताळा आणि खामगाव तालुक्यातील प्रादेशिक वनविभागांतर्गत येणारा भाग ज्ञानगंगा अभयारण्यात समाविष्ट केला जावा, असा विचार समोर आला होता. त्याबाबत सर्वेक्षणही झाले होते, अशी माहिती आहे. मात्र, कोरोनामुळे बदललेली परिस्थिती वनविभागांतर्गत तापलेले वातावरण या मुद्यांमुळे हा विषय मागे पडला होता. त्यास आता पुन्हा एकदा गती देण्याची गरज व्यक्त होत आहे.
--व्याघ्र संवर्धन समितीच्या बैठकीची गरज--
या सर्व पार्श्वभूमीवर आता व्याघ्र संवर्धन समितीची एक बैठक होण्याची गरज निर्माण झाली आहे. सोबतच ज्ञानगंगा अभयारण्याच्या संवर्धनालाही त्यामुळे प्राधान्य मिळण्यास मदत होईल, असा कयास व्यक्त केला जात आहे.