लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील ७३८ पैकी ५५० कोविड - १९ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रशासनाकडून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व कोविड सेंटरवरील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन देऊन आपले प्रश्न मांडले. कोविड कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
कोरोना काळात अविरत सेवा दिल्यानंतर आता कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. बुलडाणा जिल्हा कोविड कंत्राटी आरोग्य कर्मचारी संघटनेच्यावतीने बुलडाणा जिल्हातर्फे पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष अमोलकुमार गवई, उपाध्यक्ष दयानंद गवई, महिला जिल्हा अध्यक्ष दीपाली लहाने, जिल्हा संघटनप्रमुख शे. जहिर, जिल्हा सह संघटनप्रमुख संदीप भालेराव, डॉ. प्रतीक्षा चव्हाण, डॉ. संतोष रायकर, निकिता वानखेडे, पायल मोरे, प्रवीण केंधळे, अविनाश वाहुले, संजय मोरे, नरसिंह जायभाये, मयूर अंभोरे, डॉ. पाटील, डॉ. मानमोडे, मयुरी दुपटे, विशाल जाधव, दीपाली बोनगणे, विशाल तुपकर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.