धाड : सोशल मिडियावर धार्मिक बाबतीत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून सामाजिक शांतता, सुव्यवस्था कायदा धोक्यात आणणाऱ्या घटकांच्या विरुद्ध समाजातील सर्व नागरिकांनी एकत्रीत येऊन अशा प्रवृत्तीचा बिमोड करत पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामूनी यांनी धाड येथील आयोजित शांतता समिती बैठकीत बोलताना केले. गेल्या आठवडाभरात धाड पोलिस ठाण्यात धार्मिक भावना भडकवणाºया सोशल मिडियावर पोस्ट पसरवण्यात आल्याने या ठिकाणी जातीय तणाव निर्माण झाला होता. मात्र शांतता समिती व पत्रकारांनी सदर प्रकरणी नागरिकांना शांत करत प्रशासनास मदत केली. या पार्श्वभुमिवर ठाणेदार संग्राम पाटील यांनी धाड पोलिस स्टेशन येथे शांतता समितीची सभा आयोजित केली. यावेळी मोबाईलच्या माध्यमातून सध्या विद्यार्थ्यांपासून तरुणापर्यंत जो तो सोशल मिडियावर व्यस्त आहे. याच माध्यमातून केवळ अज्ञानापोटी काही जण आक्षेपार्ह पोस्ट मिडियावर टाकतात, याचे परिणाम समाजास भोगावे लागतात. यासाठी समाजातील प्रतिष्ठीतांनी तरुणांच्या गृपला मार्गदर्शन करावे असे आवाहन केले. प्रास्ताविक ठाणेदार संग्राम पाटील यांनी केले. या बैठकीत एसडीपीओ बी. बी. महामूनी यांनी धामणगाव बढे खून प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल शांतता समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चोरीच्या अफवा व घटना, गस्त यावर सदस्यांनी प्रश्न मांडले. पोलिसांच्या वतीने अशा कुठल्याही घटना वा अफवा गांभीर्याने दखल घेऊन योग्य कारवाईचे आश्वासन ठाणेदार पाटील यांनी दिले.(प्रतिनिधी)
सोशल मिडियावर धार्मिक वा वैयक्तीक आक्षेपार्ह पोस्ट करणाºयावर कठोर कारवाई करणार. - संग्राम पाटील ठाणेदार, धाड