हिवरा आश्रम : शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बी-बियाणे, यांची माहिती होणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करताना कृषी क्षेत्रातील नवनवीन संशोधनाबाबत जागरूक राहायला हवे. ही जागरूकता व नवज्ञान कृषी मेळावा किंवा कृषी प्रदर्शनातून होते. त्यामुळे कृषी प्रदर्शन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प.पु.शुकदास महाराज यांनी केले. स्थानिक विवेकानंद आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद जन्मोत्सवास २९ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून, यावेळी आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त विवेकानंद आश्रम व निधी क्रिएशन अँण्ड इव्हेंट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हिवरा आश्रम येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुकदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी शुकदास महाराजांचे स्वागत लक्ष्मण दारमोडे यांनी केले. शेतकर्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी विविध स्टॉल लावण्यात आलेली आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निधी क्रिएशन अँण्ड इव्हेंट नाशिकचे संचालक मनिष ढोले होते, तर मिर्झा रफीक बेग, आश्रमचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विष्णूपंत कुलवंत, विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर, प्रा.कैलास भिसडे, नारायण भारस्कर, प्रा.जी.के.ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी बजरंग बनसोडे, तालुका कृषी अधिकारी मधुकर काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाल लभाणे, मनिष ढोले सत्यजीत सावंत, विक्की सावंत, सुभाष पवार, मिलिंद खंडेराव, महादेव लभाणे, प्रवीण भागवत, भगवान पुरी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन अशोक गिर्हे यांनी तर आभार प्रवीण ढोले यांनी मानले.
कृषी प्रदर्शन काळाची गरज - शुकदास महाराज
By admin | Published: January 30, 2016 2:25 AM