- मनोज पाटीललोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : महाराष्ट्राच्या मातीशी नाते असलेल्या पानिपतच्या रोड मराठा समाजातील नीरज चोप्रा या तरुणाने भालाफेकीत जगज्जेतेपद मिळवित देशाच्या सन्मानात भर घातली. या तरुणाच्या कुटुंबीयांचे जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याशी श्रद्धेसह भावनिक नाते आहे. हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खंडरा या गावचा मूळ रहिवासी असलेल्या नीरज चोप्रा यांचे काका भीम चोप्रा व ॲड. कर्मवीर चोप्रा व व क्षत्रिय मराठा महासभा कर्नालचे अध्यक्ष रामपाल मुळे हे दिल्लीतील एका मित्राच्या माध्यमातून सन २००९ मध्ये ते १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे आले होते. दरम्यान, त्यांची राहण्याची व्यवस्था डॉ. गोपाल डिके यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यानंतर जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त चोप्रा परिवार सिंदखेड राजा येथे आले. त्यावेळी डॉ. गोपाल डिके यांनी त्यांची चिखली अथवा बुलडाणा येथील विश्रामगृहावर राहण्याची व्यवस्था केली होती. त्यावेळी त्यांना जिल्ह्यातील लोणार येथील प्रसिद्ध सरोवर व शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरसुद्धा दाखविले. जुलै २०१५मध्ये खासदार प्रतापराव जाधवांसह महाराष्ट्रातील सहा शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ पानिपत शौर्य भूमी दर्शन व रोड मराठा समाजाच्या भेटीकरिता पानिपतला गेले होते.
खंडरा येथे दाेन दिवस केला हाेता मुक्काम महाराष्ट्रातील नात्यागोत्यातील असलेल्या लोकांच्या भेटीची या परिवाराला नेहमीच ओढ राहिली आहे. येथील संपर्कातून या परिवाराने डॉ. गोपाल डिके यांना घरी येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. त्यांच्या आग्रहास्तव सन २०१९मध्ये डॉ. डिके हे त्यांच्या खंडरा गावी गेले. त्यावेळी नीरज चोप्राच्या घरीच दोन दिवस मुक्कामी राहिले. दरम्यान या परिवाराने त्यांना पानिपत, कर्नाल, कुरुक्षेत्र दाखविले.
नीरज चोप्रा यांच्या कुटुंबीयांसोबत दोन दिवस राहण्याचा अनुभव मी घेतला आहे. अत्यंत मनमिळावू कुटुंब असून, आजही चोप्रा परिवार माझ्या संपर्कात आहे. खंडरा येथे गेलो तेव्हा नीरज चोप्रा पटियाला येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. हा उल्लेखही त्यावेळी या कुटुंबीयांनी माझ्याकडे करीत नीरज हा निश्चितच चोप्रा कुटुंबियांचे नाव मोठे करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता. तो आज खरा ठरल्याचा मला आनंद आहे. - डॉ. गोपाल डिके, बुलडाणा