येथील ग्रामपंचायतमध्ये प्रशासक नेमल्यानंतर सामान्य जनतेसाठी असणाऱ्या किमान सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले आहे. येथील प्रशासकीय व्यवस्था संपूर्णपणे कोलमडली आहे. मागील चार महिन्यांपासून गावात अस्वच्छता पसरली आहे. कित्येक महिने गावातील नाल्या साफ केल्या जात नाहीत. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. गावामधील सार्वजनिक खांबावरील दिवे कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठासुद्धा अनियमित आहे. गावामध्ये कोरोनाकाळात प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचे कुठलेही पालन केले जात नाही. कोरोनाविषयी गावांमध्ये कुठलेही गांभीर्य राहिले नाही. मजुरी वेळेवर मिळत नसल्यामुळे गावातील नाल्या साफ करणारे मजूर कित्येक दिवसांपासून कामावर आले नाही. मध्यंतरी बाहेरगावाहून मजूर बोलावून नाल्यांची थातूरमातूर साफसफाई करण्यात आली. एकाच वेळेस संपूर्ण गावातील नाल्यांची सफाई केल्यामुळे संपूर्ण गावात घाण पसरली होती. ती वेळेवर न उचलल्यामुळे परत नालीत जाऊन पडली. गावातील घाण पाणीसुद्धा नालीमध्ये साचून राहिले आहे. गावांच्या सोयीसुविधा शासनाचा मोठा खर्च होत असताना हा पैसा नेमका कुठे खर्च होतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या अस्वच्छतेमुळे गावात रोगराई वाढण्याची शक्यता आहे. गावकऱ्यांनी कोणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न आता पडला आहे.
विद्युत पुरवठ्याची समस्या
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्यामुळे विद्युत कर्मचारी सुद्धा गावात राहत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागतो. गावकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा रामभरोसे आहेत. मध्यंतरी वसुलीसाठी गावकऱ्यांचा सार्वजनिक पाणीपुरवठा ग्रामपंचायत प्रशासनाने बंद करून गावकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.