डोणगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. डाेणगाव परिसरात कुठल्याच कंपनीचे नेटवर्क राहत नसल्याने इच्छुक उमेदवार त्रस्त झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास बराच विलंब हाेत असल्याने ताटकळत बसावे लागत आहे.
डोणगाव येथे बी. एस. एन. एल., आयडीया, व्होडाफोन कंपन्यांच्या नेटवर्क मिळत नसल्याने व्यापारी व इच्छुक उमेदवार त्रस्त झाले आहेत. बी. एस. एन. एल. ची ब्रॉडबँड सेवा डोणगाव येथे नेहमीच खंडित होते. त्यामुळे अनेकांनी त्रस्त हाेऊन बी. एस. एन. एल. कनेक्शन बंद केले आहेत. एवढेच नव्हे तर सेतूधारकही त्रस्त झाल्याने त्यांनी खासगी नेटवर्कचा आधार घेतला आहे. पण गत दोन दिवसांपासून आयडीया, व्होडाफोन, जिओ, एअरटेलचीही सेवाही धिम्या गतीने मिळत असल्याने बँकेसह व्यापारी व इच्छुक उमेदवार त्रस्त झाले आहेत. सध्या निवडणुकीला उभे राहणाऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते उघडणे आवश्यक असल्याने स्टेट बँक़, दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह. बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत खाते उघडण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली आहे. मात्र नेटवर्कच्या समस्येमुळे व बी. एस. एन. एल. च्या व इतर खासगी ऑपरेटरच्या सेवा वारंवार खंडित होत असल्याने बँक प्रशासनही त्रस्त झाले आहे. बँक कर्मचारी खाते उघडण्यासाठी तत्पर असताना मात्र नेटवर्कच नसल्याचे चित्र आहे. याकडे संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.