विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नाबार्ड व राज्य शासनाने निधी देण्यास नकार दिल्यामुळे बुलडाणा जिल्हा केंद्रिय सहकारी बँकेने नवीन खातेदारांना पिककर्ज न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवे खातेदार पिककर्जापासून वंचित राहणार आहेत. तर जुन्या खातेदारांनी मागील वर्षीचे कर्ज भरल्यास दहा टक्के वाढीव पिककर्ज देण्यात येणार आहे.खरीप हंगाम २०१७ -१८ ला लवकरच सुरूवात होणार असून, त्याकरिता शेतकऱ्यांना पिककर्जाच नितांत गरज आहे. त्यामुळे जिल्हा बँक पिककर्ज वाटपाला सोमवारपासून सुरूवात करणार आहे. जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज देताना ८५ टक्के रक्कम राज्य बँक व नाबार्डकडून मिळते तर केवळ १५ टक्के रक्कम ही जिल्हा बँकेची असते. यावेळी राज्य बँक व नाबार्डने ८५ टक्के रक्कमदेण्यास नकार दिला. त्यामुळे नवीन खातेदारांना कर्ज न देता जुन्याच खातेदारांना कर्ज देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. बँकेचे जिल्ह्यात १६ हजार चालू खातेदार असून, ५८ हजार १०८ खातेदार थकीत आहेत. १६ हजार चालू खातेदारांपैकी ८ हजार खातेदारांनी मागील वर्षीचे कर्ज भरून शुन्य टक्के व्याजदराचा फायदा घेतला आहे. जिल्हा बँकेने वसूलीमध्ये वाढ केली असून, ३१ मार्च २०१६ मध्ये बँकचा एनपीए ८५.७६ टक्के होता. तर तो आता ६४.५८ टक्के झाला. एनपीएमध्ये २१ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या ३१ मार्च २०१६ च्या नियमानुसार कोणत्याही बँकेला अस्तित्व टिकविण्याकरिता ७ टक्के भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) असणे आवश्यक आहे. तर जिल्हा बँकेचे त्यावेळी ७.२८ टक्के होते. आता यामध्ये आरबीआयने बदल केला असून, बँकेचा अीआरएआर ९ टक्के असणे आवश्यक आहे. तर बुलडाणा जिल्हा बँकेचा सीआरएआर सध्या १०.८४ टक्के आहे. त्यामुळे बँकेची स्थिती भक्कत असल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.आजपासून पिक कर्जवाटप सुरूजिल्ह्यात बँकेच्यावतीने सोमवारपासून जुन्या खातेदारांना खरीप हंगाम २०१७ - १८ करिता पिककर्ज वाटपाला सुरूवात करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी गतवर्षीचे कर्ज भरले त्यांना दहा टक्के वाढीव पिककर्ज मिळणार आहे. त्यामुळे ज्या खातेदारांनी मागील वर्षीचे कर्ज भरले नाही, त्यांनी कर्ज भरून नवीन कर्ज घेण्याचे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.राज्य बँकेकडे निधीची मागणीजिल्हा बँकेच्यावतीने राज्य बँकेकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. जर राज्य बँकेने निधी दिला तर नवीन खातेदार शेतकऱ्यांना सूद्धा कर्ज देण्यात येणार आहे. बँकेच्यावतीने वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र राज्य बँक कोणता निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.कर्ज देण्याची सोपी पद्धतजिल्हा बँकेच्यावतीने शेतकऱ्यांना कर्ज देताना राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणे प्रताडणा करण्यात येत नाही तर अत्यंत सोप्या पद्धतीने कर्ज दिल्या जाते. जिल्हा बँकेतून कर्ज घेण्याकरिता शेतकऱ्यांना विविध कागदपत्रे गोळा करण्याची गरज नाही. तर शेतकऱ्यांनी केवळ सातबारा व डिक्लेरेशन दिल्यास शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना अर्ज केल्यानंतर त्वरीत कर्ज मिळते.बँकेच्यावतीने मागील वर्षी घेतलेले पिककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी नवीन कर्ज दहा टक्क्यांनी वाढीव देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही. बँकेतील १६ हजारपैकी ८ हजार शेतकऱ्यांनी हा लाभ घेतला आहे. अन्य शेतकऱ्यांनीही मागील कर्ज भरून नवीन कर्ज घेण्याचा लाभ घ्यायला हवा. - डॉ. अशोक खरातसचिव, जिल्हा केंद्रिय सहकारी बँक, बुलडाणा
नवे खातेदार शेतकरी पिककर्जापासून वंचित
By admin | Published: May 21, 2017 8:13 PM