- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: राज्यात ३९ लाख ५४ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिक आहे. परंतू सध्या हवामानातील आद्रता वाढल्यामुळे सोयाबीन पिकावर रोगाचे नवे संकट निर्माण झाले आहे. आद्र हवामानामुळे सोयाबीनच्या पानासह शेंगावर जिवाणूचे ठिपके पडले आहेत; त्याचबरोबर शेंगानाही गळती लागल्याने सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. सोयाबीन पिकापासून उत्पन्नात भरघोस वाढ होत असल्यामुळे शेतकरी हे पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. पूर्वी विदर्भातच सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक होते. मात्र आता राज्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. त्यामुळे यावर्षी राज्यात नियोजीत क्षेत्रापेक्षा सोयाबीनचा पेरा अधिक आहे. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३४ हेक्टर आहे. त्यापैकी ३९ लाख ५४ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झालेली आहे. परंतू सध्या सर्वत पावसाचे वातावरण असल्याने या पिकाला फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. वातावरणात आद्रतेचे प्रमाण अधिक झाल्याने सोयाबीन पिक रोगीष्ट बनले आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडांच्या पानावर व शेंगावर त्रिकोणी, चौकोणी आकाराचे तपकिरी, करड्या रंगाचे ठिपके पडले आहेत. काही ठिकाणी रोगाची तिव्रता वाढल्याने सोयाबीनच्या झाडाची पाने व शेंगा गळून पडत आहे. हवामानातील आद्रता जस-जशी वाढत जात आहे, त्याच वेगात हा रोगही झपाट्याने वाढत आहे. सध्या सोयाबीन पिक हे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. परंतू बदलत्या वातावरणाचा परिणाम या पिकावर झाल्याने शेंगा भरण्यापूर्वीच गळून पडत आहेत. पानावर छिद्रेही पडत आहेत. त्यामुळे शेतकºयांसमोर सोयाबीन पिक वाचविण्याचे संकट आता निर्माण झाले आहे.
सध्या सोयाबीन दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. शेतकºयाने वेळेवर फवारणी केली नसेल, तर काही ठिकाणी असा प्रकार असू शकतो. त्यामुळे शेतकºयांनी घाबरून न जाता कृषी सल्ला घेऊन वेळीच योग्य त्या उपाययोजना कराव्या.- नरेंद्र नाईक,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.