बुलढाणा : ‘इझ ऑफ लिव्हिंग’ नुसार सुरळीत सेवेबरोबर ग्राहकांना २४ तासात वीज जोडणी देण्यासाठी महावितरणचे प्रयत्न आहेत. याची सुरूवात बुलढाणा जिल्ह्यातून करण्यात आली आहे. दरम्यान, एप्रिल ते जुलै या चार महिन्याच्या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी अशा विविध वर्गवारीतील ८ हजार ७६७ ग्राहकांना नविन वीज जोडणी देण्यात आली आहे.
नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने ‘इझ ऑफ लिव्हिंग’ संकल्पना आणली आहे. यात वीजपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यानुसार ग्राहकांना तत्काळ नविन वीज जोडणी देणे, सुरळीत व दर्जेदार वीज पुरवठ्यासह सर्व सेवा तत्परतेने देण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी जिल्ह्यातील नवीन वीजजोडणी तत्परतेने देण्यासह खंडित वीजपुरवठा, बिलिंग व ग्राहकांच्या इतर तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याला वेग देण्यासाठी आणि वीज बिलाच्या वसुलीबाबत २६ ऑगस्ट रोजी आढावा घेतला.
२४ दिवसात ३८ टक्के वीज बिलाची वसुलीवीज बिलाची वसुली हा महावितरणच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. खामगाव विभागात एप्रिल ते जुलै महिन्याचे अद्याप ९ कोटी ३५ लाख वसुल होणे बाकी आहे. बुलढाणा आणि मलकापूर विभागातूनही या कालावधीत अणुक्रमे ७ कोटी ५२ लाख आणि ६ कोटी ६९ लाख रूपयाच्या वीजबिलाची वसुली येणे बाकी आहे. याशिवाय जिल्ह्याची ऑगस्ट महिन्याची वीजबिलाची ५५ कोटी २१ लाखाची डिमांड आहे. ऑगष्ट महिन्याच्या २४ दिवसात एकुण उद्दिष्टाच्या केवळ ३८ टक्केच वसुली झाली असून, थकीत वसूल करण्याचे आदेश मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी दिले आहेत.
वीज बिलाचे प्रत्येक अभिंत्यांना दिले उद्दिष्टया बैठकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी प्रत्येक शाखा अभियंतापर्यंत उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. पोलिस विभागाच्या सभागृहात महावितरणची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अधीक्षक अभीयंता सुरेंद्र कटके, कार्यकारी अभियंता प्रशासन बद्रीनाथ जायभाये, विभागीय कार्यकारी अभियंते मंगलसिंग चव्हाण, विरेंद्रकुमार जसमतीया, रत्नदिप तायडे, व्यवस्थापक मनिषकुमार कदम यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंते व शाखा अभियंते उपस्थित होते.