विजय मिश्रा शेगाव, दि. २३-शेगाव विकास आराखड्यांतर्गत हजारो रुपये किमतीचे नवीन एलईडी पथदिवे बसविण्यात आले; परंतु यापैकी बहुतांश पथदिवे बंद पडलेले असून, अनेक पथदिवे लावल्यापासून सुरूच झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.शेगाव विकास आराखड्यामधील रस्त्याच्या बांधणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केल्या जात आहे. यामध्ये विद्युत पोल उभारणी, भूमिगत वायर टाकणे आणि पोलवर एलईडी लाइट बसवून घेणे ही सर्व कामे सार्वजनिक बांधकामकडेच होती. यामधील काही रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर व त्यावरील विद्युत पोल उभारणीसह पथदिवे लावल्यानंतर सार्वजनिक बांधकामने ते नगर परिषदेला ३0 मे १६, १८ जुलै १६, ५ ऑक्टोबर १६ आणि ६ डिसेंबर १६ ला दिलेल्या पत्रानुसार हस्तांतरित केले. नगर परिषदने ते हस्तांतरित करूनही घेतले; परंतु आता २३ जानेवारी रोजी नगर परिषदने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रामध्ये आपण सांगितलेल्या रोडनिहाय कंत्राटदाराकडून पोल उभारणी व एलईडी बसविल्याचे पत्र मिळाले आहे; परंतु अद्यापपर्यंंत हस्तांतरणाची कार्यवाही पूर्ण झालेली नसल्याचे सांगून उपरोक्त रस्त्यावरील अनेक ठिकाणचे पथदिवे आतापासून बंद पडले आहे, तर काही ठिकाणचे लावल्यापासून सुरू झालेच नसल्याचे सांगण्यात आले आहे आणि अशा भागातील नागरिकांच्या तक्रारीही अनेक आहेत. याबाबत संबंधित कंत्राटदाराला सांगितल्यानंतरदेखील संबंधित कंत्राटदार तक्रारीची दखल घेत नसल्याने नागरिकांचा रोष नगर परिषदेवर व्यक्त होत आहे, त्यामुळे सार्वजनिक बांधकामने संबंधित कंत्राटदाराला सांगून एलईडी पथदिवे चालू करून देण्याची मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली आहे. तथापि, एलईडी पथदिवे बसविण्याचा कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. त्यामुळे यातील त्रुटी दुरूस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. दरम्यान, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा केली जाईल.-अतुल पंत, मुख्याधिकारी, शेगाव.
शेगाव आराखड्यामधील नवीन एलईडी पथदिवे बंद!
By admin | Published: January 24, 2017 2:26 AM