नीलेश जोशी, बुलढाणा: शहरानजीकच्या राजूर घाटात देवीच्या मंदिराजवळ १३ जुलै रोजी एका महिलेवर सात ते आठ जणांनी सामुहिक बलात्कार केल्याच्या कथीत प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पीडित महिलेने तिच्यावर सामुहिक लैंगिक अत्याचार झाला नसल्याचा जबाब दिला आहे.
सामुहिक बलात्कार संदर्भाने वैद्यकीय तपासणी करण्याची गरजही नसल्याचे पीडितेने मोताळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर स्पष्टपणे लिहून दिले आहे. पीडित महिलेचा मोताळा न्यायालयातही इन कॅमेरा जबाब घेण्यात आला आहे.या संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी पीडित महिलेच्या समवेत असलेल्या नातेवाईक व्यक्तीच्या तक्रारीवरून प्रकरणात पीडितेवर सामुहिक बलात्कारासह, खूनाचा प्रयत्न आणि मारहाण करत लुटमार करण्यासाबेतच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी १३ जुलै रोजी रात्री बोराखेडी पोलिसात ७ ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात पोलिसांनी मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील राहूल रमेश राठोड याच्यासह सात जणांच्या शोधत सध्या पोलिस आहेत. प्रकरणाचे गांभिर्य पहाता बुलढाणा, बुलढाणा ग्रामीण आणि धामणगाव बढेचे ठाणेदार यांनी १३ जुलै रोजी रात्री बोराखेडी पोलिस ठाणे गाठले होते. प्रकरणाची माहिती शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनीही बोराखेडी पोलिस ठाणे गाठत पोलिस प्रशासनाला अशा गंभीर प्रकरणात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत धारेवर धरले होते.
पोलिस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट
राजूर घाटातील देवीच्या मंदिरामगील ज्या भागात कथितस्तरावर ही घटना घडली होती. तेथे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्यासह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक बळीराम गिते यांना योग्य पद्धतीने तपास करण्याच्या सुचना दिल्या. फॉरेन्सीक टीमसह श्वान पथकासही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. तसेच पीडित महिलेचा महीला दक्षता समिती समक्ष बयाणही नोंदविण्यात येऊन वैद्यकीय तापसणीसाठी पीडितेस प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. त्यानंतर ही बाब समोर आली.
न्यायालयातही नोंदविली साक्ष
पीडित महिलेचा मोताळा न्यायालयात कलम १६४ अंतर्गत इन कॅमेरा बयान नोंदविण्यात आला आहे. बऱ्याचदा काही प्रकरणात प्रसंगी साक्ष किंवा जबाब फिरविल्या जातो. अशा स्थितीत न्यायालयात इन कॅमेरा नोंदविलेला बयाण हा महत्त्वपूर्ण साक्ष म्हणून गणल्या जातो. त्यानुषंगाने या संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी अनुषंगिक पाऊल उचलेल. अलिकडील काळात असा जवाब नोंदवणे बंधनकारक झालेले आहे.
आठ पैकी पाच आरोपींना अटक
बुलढाणा: राजूर घाटामधील कथितस्तरावरील सामुहिक बलात्कार प्रकरणात पोलिासंनी आठ पैकी चार आरोपींना अटक केली आहे. यासोबतच याप्रकरणातील उर्वरित आरोपींनाही लवकच अटक करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिस सुत्रांनी दिले. १४ जुलै रोजी दुपारीच पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी यासंदर्भाने आरोपींची अेाळख पटली असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले आहेत. त्यानुषंगाने सायंकाळी प्रकरणातील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.