डोणगाव (बुलढाणा) लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी पसार झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे कळताच वधू-वर पक्षाच्या मंडळींमध्ये गोंधळ उडाला. लग्नाआधी दिलेली रक्कम वृधकडील मध्यस्थींकडून परत न मिळाल्याने वराकडील मध्यस्थीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यामध्ये मेहकर, डोणगाव येथील तिघांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना २८ सप्टेंबरला अटक केली आहे तर एकजण फरार आहे.
जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा येथील एका मुलाचे दयाराम नारायण चौधरी या समाजातील मध्यस्थी व्यक्तीने लग्न जुळविण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी डोणगाव येथील रसूल रफिक बागवान, मेहकर येथील शफउत खा जब्बर खा पठाण व भुऱ्या (अपूर्ण नाव) यांनी मेहकर येथील एका मुलीचे स्थळ सुचविले होते. डोणगाव येथे पाहणीचा कार्यक्रम झाला. पसंता- पसंती झाल्याने दयाराम चौधरी यांच्याकडून लग्न जुळवून देण्यासाठी १ लाख ३० हजार रुपये घेऊन २६ जुलै रोजी पाचोरा येथे लग्न पार पडले. दरम्यान, २८ जुलै रोजी नवरीने शौचास जाण्याचे कारण सांगून पोबारा केला. ती परत आलीच नाही. तेव्हा वधू पक्षाकडील मध्यस्थींना नवरीला आणून द्या, नाहीतर घेतलेले पैसे परत देण्याची मागणी केली; मात्र, डोणगावातील मध्यस्थीने ते देण्यास नकार दिला. याला कंटाळून वर पक्षाकडील मध्यस्थी असलेल्या दयाराम चौधरी यांनी २ ऑगस्ट रोजी शिदांड शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृताच्या मुलाने दिली पोलिसांत तक्रार याप्रकरणी १४ सप्टेंबर रोजी मृतकाचा मुलगा काशिनाथ दयाराम चौधरी यांनी तक्रार दिल्यानंतर वधू पक्षाकडील मध्यस्थी असलेल्या शफउत खा जब्बार खा पठाण (रा. मेहकर), रसुल रफिक बागवान (डोणगाव) आणि भुया नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. तर २८ सप्टेंबर रोजी शफत खा जब्बार खा पठाण, रसुल रफिक बागवान या दोघांना अटक केली. अद्यापही भुया हा आरोपी फरार आहे.