खामगाव : दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणी मलकापूर येथे अटक करण्यात आलेल्या औरंगाबादेतील मनोहर एकनाथ कापसेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २६ जानेवारीला त्याची पोलिस कोठडी संपल्यामुळे मलकापूर न्यायालयात त्यास हजर करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणाचा समांतर तपास दिल्ली येथील नॅशनन इन्व्हेस्टीगेशन एजन्सीचा टीएफएफसी सेल करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूर शहरातील बसस्थानकाजवळ छापा टाकून दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा सह औरंगाबादमधील गारखेडा भागातील ३२ वर्षीय मनोहर कापसेला १३ जानेवारीला रात्री अटक केली होती. एनआयएच्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली होती. त्याच्याकडून एक हजार रुपयांच्या १00 आणि ५00 रुपयांच्या १९0 अशा एक लाख ९५ हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पी. डी. शिकारे आणि पोलिस उपनिरीक्षक आर. एस. सोनवणे सोनोने तथा विकास खानझोडे, विलास साखरे, अत्ताउल्लाखान, भारत जगंले, नीलेश वाकडे आणि एनआयए टीएफएफसी सेलचे दिल्ली येथील अधिकारी विनोदकुमार शिवरामन नायर यांनी ही कारवाई केली होती. या प्रकरणी मलकापूर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने २६ जानेवारीपर्यंत त्यास पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्याने त्यास पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मोबाईल रेकॉर्ड तपासणार या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेला तपासात आरोपी मनोहर कापसेने फारसे सहकार्य केले नसल्याची माहिती समोर येत आहे. परिणामस्वरुप आता स्थानिक गुन्हे शाखा त्याच्या भ्रमणध्वनीतील कॉल रेकॉर्डची माहिती घेऊन त्यानुषंगाने पुढील तपास करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बनावट नोटा त्याने नेमक्या कोठून आणल्या व देणारा संबंधीत कोण आहे, याचीही फारशी माहिती मनोहर कापसेला नसल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणात तपास करीत असतानाच एनआयएचा संबंधीत सेलही प्रकरणाचा समांतर तपास करीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
एनआयए करणार समांतर तपास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2016 12:19 AM