लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर ३१ मे रोजी दुपारी बारा वाजताच्यादरम्यान ट्रक अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मामाच्या अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या भाचीचा दुपारी ४ वाजताच्यादरम्यान रेल्वेगेटसमोरच्या महामार्गावर ट्रकखाली आल्याने मृत्यू झाला. तसेच त्यांचे पती व मुलगा गंभीर जखमी झाले आहे. चार तासांत शहरातील महामार्गांवर ट्रकखाली चिरडून मामा व भाची दोघांचा मृत्यू झाल्याने शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सोमवार हा नांदुरा शहरासाठी मोठा घातवार ठरला. सकाळीच शहरातील ठेकेदार सुभाष मोहता यांचा गणेशपूर खामगाव येथे अपघातात मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत होती. त्यात दुपारी खरेदी विक्री संघासमोर वडनेर भोलजी येथील निनाजी धोंडू कुयटे (वय ६५) यांना ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अपघाताची माहिती त्यांचे संग्रामपूर येथील आप्तेष्ट यांना मिळाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी भाची लिलाबाई हरिदास नागे (वय ४० वर्ष ), पती हरिदास नागे (वय ५०) व मुलगा विजय हरिदास नागे (वय २० वर्ष) दुचाकीने नांदुराकडे जात होते. रेल्वे गेटसमोरील राष्ट्रीय महामार्गावर एम .एच.२८ ए.एफ.२३६८ क्रमांकाच्या दुचाकीला नागपूरवरून मुंबईकडे जाणाºया आर .जे.१९ जी. एफ.५९४६ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील लिलाबाई नागे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती हरिदास नागे व मुलगा विजय नागे जखमी झाले. या अपघाताप्रकरणी ट्रकचालक आरूराम रुगाराम रुडी (वय ४०वर्ष) सरात्रा जिल्हा बाडनेर राजस्थान याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. या दोन्ही अपघातामध्ये ओम साई फाउंडेशनचे प्रवीण डवंगे व विलास निंबोळकर व त्यांच्या सहकाºयांनी अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात पोहोचविले.
चार तासांत मामा व भाचीचा मृत्य
नांदुरा शहरात सकाळी बारा वाजता ट्रकने दुचाकीस धडक देऊन झालेल्या अपघातात मामा निनाजी धोंडू कुयटे यांचा मृत्यू झाला. मामाच्या अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या लीलाबाई हरिदास नागे भाचीचा नांदुरा शहरातच मामाच्या अपघाताच्या घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर ट्रकने चिरडून मृत्यू झाल्याने समाजमन सुन्न झाले. एकाच दिवशी दोन अपघात चार तासांच्या आत मामाचा मृत्यू तर व भाचीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे .