जिल्हाधिकारी यांनी ६ मार्च रोजी यासंदर्भात आदेश निर्गमित केला असून सर्व ठिकाणचे बाजारही बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे ८ मार्च ते १६ मार्चपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील सर्व प्रकारच्या आस्थापना, दुकाने सुरू राहतील. कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळणे त्यांना बंधनकारक राहणार आहे. त्याचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. हॉटेल्स, खाद्यगृहे ही सकाळी ९ ते सायंकाळी पाच या कालावधीत ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत त्यांना केवळ पार्सल देण्याची मुभा राहील. या व्यतिरिक्त या कालावधीत सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. दूध विक्रेत्यांना सकाळी सहा ते दुपारी तीन आणि सायंकाळी सहा ते रात्री ९:३० पर्यंत मुभा राहील. या कालावधीत होणाऱ्या पूर्वनियोजित परीक्षा या वेळापत्रकानुसार होणार असून परीक्षेच्या कालावधीत परीक्षेचे ओळखपत्र संबंधितांनी सोबत ठेवणे अनिवार्य राहील.
--लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींना मुभा--
या कालावधीत लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींना तहसीलदारांकडून परवानगी घेणे अनिवार्य राहील. तसेच लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ५० व्यक्तींमध्ये बॅँड पथकातील सदस्यांचाही समावेश राहील, असे ६ मार्च रोजीच्या आदेशात स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त गर्दी जमवून करण्यात येणारी निदर्शने, मोर्चे, रॅली, आंदोलने यावर बंदी घालण्यात आली आहे; मात्र केवळ पाच व्यक्तींच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन शासकीय विभागास निवेदन देता येईल, असेही आदेशात नमूद केेले आहे.
--बाजार समितीनेही गर्दीवर नियंत्रण ठेवावे--
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशासनावर राहील. तसेच शारीरिक अंतराचे पालन, मास्कचा वापर होतो की नाही, तथा हात धुण्याची व्यवस्था बाजार समिती सचिवांनीच करणे गरजेचे आहे. यासोबतच जिल्हा उपनिबंधकांनी सर्व संबंधित बाजार समित्यांमध्ये जाऊन नियमांचे पालन होते की नाही, याची खात्री करणे गरजेचे आहे.