देऊळगाव राजा : शासनाच्या विविध विकासकामांतर्गत मिळालेल्या निधीत अनियमितता केल्याप्रकरणी तालुक्यातील निमगाव गुरू येथील तत्कालीन सरपंच यांच्याविरोधात पोलिसात फौजदारी गुन्हा नोंदविण्यासंदर्भात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी रीतसर तक्रार दिली. यामध्ये ग्रामसचिव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे शासनाच्या निधीत केलेली अफरातफर सरपंच राधाबाई चित्ते व ग्रामसचिव मोरे यांना चांगलीच भोवणार आहे.
तालुक्यातील निमगाव गुरू येथील तत्कालीन सरपंच राधा अनिल चित्ते व तत्कालीन ग्रामसेवक एस.पी. मोरे यांनी संगनमताने विविध शासकीय निधींत आर्थिक भ्रष्टाचार केल्याबाबत ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर आत्माराम भालेराव आणि राजेंद्र मोतीराम चित्ते यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रारी नोंदविली होती. तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनाच्या विविध विकासकामांसाठी प्राप्त निधीत शौचालय बांधकाम, रंगमंच आवार भिंत बांधणे, समाजमंदिर दुरुस्ती बांधकाम, नाली दुरुस्ती बांधकाम, अंगणवाडीसाठी कपाट व इतर साहित्य खरेदी, एलईडी लाइट खरेदी, अंगणवाडीसाठी खेळणी खरेदी अशा विविध कामांत शासकीय निधीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार होती. यासंदर्भात गटविकास अधिकारी यांच्यामार्फत नेमण्यात आलेल्या समितीने चौकशीअंती एक लाख ५७ हजार ८६५ रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचा अहवाल दिला होता. दरम्यानच्या काळात अनियमितता केल्याचे सिद्ध झाल्यावरही पंचायत समिती प्रशासन कारवाई करण्यास विलंब करीत असल्याने तक्रारदारांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांच्याकडे तक्रार केली. यावरून २० नोव्हेंबर २०२० रोजी एका पत्राद्वारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना सदर अनियमिततेस जबाबदार व्यक्तीविरुद्ध पोलिसात फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. या आदेशाला तीन महिने उलटल्यानंतर गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी विस्तार अधिकारी एस.ए. गडाख यांना एका पत्राद्वारे तक्रार देण्यास नेमणूक केली. यावरून तत्कालीन सरपंच राधा अनिल चित्ते व तत्कालीन ग्रामसेवक एस.पी. मोरे यांना लेखी पत्र देऊन चौकशी अहवालात नमूद मुद्द्यामधील अपहारित रक्कम समप्रमाणात प्रत्येकी ७८ हजार ९३३ रुपये ग्रामपंचायत निधीमध्ये जमा करून विनाविलंब अहवाल सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली. दिलेल्या मुदतीत संबंधितांनी अपहारित रक्कम जमा न केल्याने गत २७ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात सरपंच राधा अनिल चित्ते यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यासाठी विस्तार अधिकारी गडाख यांनी रीतसर लेखी तक्रार दाखल केली, तर ग्रामसचिव मोरे हे शासकीय कर्मचारी असल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्याच्या प्रक्रियेकरिता जिल्हा परिषद प्रशासनाकडे पूर्वपरवानगी मागितली आहे.