माहिती भरताना अंगणवाडीसेविकांची दमछाक
बुलडाणा: अंगणवाडीसेविकांना पोषण आहाराची माहिती पोषण ट्रॅकर ॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, या ॲपमध्ये हिंदी व इंग्रजी भाषा असल्याने पोषण आहारची माहिती भरताना अंगणवाडीसेविकांची दमछाक होत आहे.
वातावरणात बदल ; शेतकरी चिंताग्रस्त
मेहकर : तालुक्यात दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. ढगाळ वातावरणही निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या गहू काढणी अंतिम टप्प्यात आहे. परंतु वातावरणातील बदलामुळे गहू उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत.
रस्ताकामाला मिळेना गती
किनगाव राजा: परिसरातील अनेक रस्त्याच्या कामाला गती मिळत नसल्याने ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उमरद शिवारातही अनेक रस्त्यांचे काम रखडलेले आहे. गावा दरम्यान, थोडेसे रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
परजिल्ह्यातून येणाऱ्यांमुळे वाढले रुग्ण
बुलडाणा : आता गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून दिवसाला रुग्ण सापडण्याचे प्रमाणही ५०० च्यावर आहे. विशेष म्हणजे, परजिल्ह्यातून आलेल्यांनीही कोरोना संसर्गात वाढ केल्याचे दिसून येते आहे. परजिल्ह्यातूत आलेल्या व्यक्तींची कुठलीही तपासणी होत नसल्याचीही बाब समोर आली आहे.
खोदकामामध्ये तुटतात केबल
धाड: अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. या रस्ता कामांमुळे बीएसएनएलची केबल लाईन तुटत आहे. त्यामुळे अनेक दिवस हे केबल बसविले जात नसल्याने इंटरनेट सेवा विस्कळीत होते. त्यामुळे शासकीय-निमशासकीय कार्यालय, पोस्ट ऑफिस व बँकामध्ये इंटरनेट सेवा विस्कळीत होत आहे.
रोहयोच्या कामावर जेसीबीचा वापर
मेहकर: रोजगार हमी योजनेमध्ये मजुराऐवजी यंत्राद्वारे ही काम केली जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे रोहयोची कामे मजुरांऐवजी जेसीबीने केल्यास व खोटी बिले काढणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश महसूल विभागाने दिले आहेत.
उन्ह्यात पाणी वाचविण्याची गरज
देऊळगाव मही : बऱ्याच ठिकाणी नळाला तोट्या नसल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. तर वाहने धुण्यासाठीही जास्त पाणी खर्च केले जात असल्याचे वास्तव आहे. मात्र, या दोन्ही बाबींकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी वाचविण्याची गरज आहे.
डोणगाव येथे सांडपाण्याची समस्या
डोणगाव : येथील सांडपाण्यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काही वाॅर्डामध्ये रस्त्यांचा अभाव आहे. जे रस्ते आहेत, त्यावरही खड्डे पडले आहेत. नाल्याच न केल्याने सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१५ दिवसांआड पाणीपुरवठा
बुलडाणा: शहराला लागून असलेल्या गावांमध्ये १० ते १५ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत आहे. आतापासूनच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
स्वच्छ मिशनअंतर्गत लोकजागृतीला फटका
बुलडाणा : घरोघरी शौचालय असावे व त्याचा नियमित वापर व्हावा, पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असा संदेश कला पथकाच्या माध्यमातून देण्यात येतो. परंतु, स्वच्छ मिशनअंतर्गत लोकजागृती कार्यक्रमाला सध्या कोरोनामुळे फटका बसला आहे.
फळांचा राजा बहरला!
सिंदखेड राजा: तालुक्यात यावर्षी फळांचा राजा बहरल्याचे चित्र दिसून येत आहे. गावरान आंब्याची झाडे फुलोऱ्याने लदबदून गेली आहेत. त्यामुळे आमराईमालकांच्या चेहऱ्यावर समाधान पहावसाय मिळत आहे.