बुलडाणा/देऊळगाव राजा: बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावमही नजीक असलेल्या खडकपूर्णा पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामाचा फायदा घेत अकोल्याकडे जाणाºया खासगी प्रवाशी गाड्यांमधील तब्बल ३५ बॅगा दरोडेखोरांनी लंपास केल्याचा प्रकार सात फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान, या प्रकरणी टाकरखेड भागीले येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे देऊळगाव राजा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.अटक करण्यात आलेले हे सर्व आरोपी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून सध्या देऊळगाव राजा पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले आहे. देऊळगाव राजा शहरापासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकपूर्णा नदीवरील पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथून जाणाºया वाहनांचा वेग कमी होता. त्याचा फायदा घेत या दरोडेखोरांनी वाहनाच्या मागील बाजूस असलेल्या डिक्कीतून प्रवाशांच्या बॅगा लुटण्याचा प्रकार येथ केला. जवळपास नऊ खासगी प्रवाशी वाहतूक करणाºया वाहनातील असा ३५ बॅग या दरोडेखोरांनी लुटल्या आहेत. दरम्यान पहाटे हा प्रकार एका खासगी बस चालकाच्या लक्षात आला. सोबतच टाकरखेड भागीले येथील काही नागरिकांनाही ही बाब समजली. त्यानंतर देऊळगाव मही पोलिस चौकीस याची माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले व टाकरखेड भागीले येथील नागरिकांच्या मदतीने तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. चार जण फरार झाले आहे. मात्र या दरम्यान पोलिसानी दरोडेखोरांनी लुटलेल्या ३५ बॅग परत मिळविण्यास यश मिळविले आहे.
दरोड्यासाठी ट्रकचा वापरउस्मानाबाद जिल्ह्यातील या टोळीत एकूण सात जण आहे. दरोड्यासाठी ते ट्रकचा वापर करत होते. देऊळगाव मही नजीकच्या खडकपूर्णा नदीवरील पुलाचे सुरू असलेले बांधकाम व तेथील भौगोलिक परिस्थितीममुळे या पुलावर वाहनांचा वेग अत्यंत कमी होतो. त्याचा फायदा घेत या दरोडेखोरांनी या सुमारे २०० मीटरच्या पट्ट्यात खासगी प्रवाशी वाहतूक करणाºया वाहनाच्या मागील डिक्कीचे कुलूप फोडत त्यातून प्रवाशांच्या बॅगा लंपास करत ट्रकमध्ये टाकून पलायन करण्याचा त्यांचा मनसुबा होता. मात्र टाकरखेड भागीले येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यावर पाणी फेरल्या गेले.
खामगाव, अकोला परिसरातही दरोड्याचा प्रयत्नअटक करण्यात आलेले तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांचे चार सहकारी फरार झालेले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसापासून अकोला, खामगाव परिसरातील मार्गावर अशाच पद्धतीने त्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यात एका प्रवाशाच्या बॅगमधून पैसे मिळाल्यानंतर चांगले कपडे सुद्धा या आरोपींनी खरेदी केल्याची माहिती देऊळगाव राजाचे पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मोठी टोळी असण्याची शक्यताउस्मानाबाद जिल्ह्यातील हे आरोपी असून सराईत गुन्हेगार असल्याने अद्याप त्यांच्याकडून चौकशीत पोलिसांना सहकार्य होत नसल्याचेही समोर येत आहे. मात्र या दरोडेखोरांची मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता असून आंतरजिल्हा स्तरावरील अनेक मोठे गुन्हे या दरोडेखोरांना अटक करण्यात आल्यामुळे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.