हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. १४- गणेश विसर्जनदरम्यान नदी, तलाव, विहिरींमध्ये मोठय़ा प्रमाणात निर्माल्य टाकण्यात येते. त्यामुळे सर्वत्र प्रदूषण होऊन पर्यावरणास धोका निर्माण होतो. यासाठी बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथील विद्या विकास विद्यालयाने पुढाकार घेतला असून, गावातील सर्वच गणेश मंडळ तसेच घरगुती गणेशाचे निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश तयार केले आहेत. या कलशात निर्माल्य गोळा करून गांडूळ खत निर्मितीसाठी प्रक्रिया केली जाणार आहे.बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथील राज्य वनश्री पुरस्कार प्राप्त विद्या विकास विद्यालय उपक्रमशील शाळा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. या विद्यालयाद्वारे पर्यावरणाच्या रक्षणासाठी हरित सेनेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षीही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी निर्माल्यामुळे परिसरातील नदी, तलाव, विहिरीत प्रदूषण होऊ नये म्हणून शाळेच्या आवारात निर्माल्य कलश तयार केला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी शाळेतील विद्यार्थी गावातील जवळपास ४५0 कुटुंबीयांना भेट देऊन निर्माल्य गोळा करून निर्माल्य कलशमध्ये टाकणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थी पर्यावरण रक्षणाचा संदेश ग्रामस्थांना देणार आहेत.निर्माल्याच्या माध्यमातून सेंद्रिय खताची निर्मितीविद्या विकास विद्यालयाच्या परिसरात निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माण केलेल्या कलशामध्ये जमा झालेल्या निर्माल्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच या खताचा उपयोग परिसरातील फुलांच्या व इतर झाडांना होणार आहे. यासाठी संस्थाध्यक्ष सुभाषराव पाटील, प्राचार्य सुनील जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.पर्यावरणाच्या संरक्षणासाठी निर्माल्य कलशाची निर्मिती करून विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न आहे. शाळेच्या प्रत्येक उपक्रमात ग्रामस्थांचा सहभाग असतो. या उपक्रमातही ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.- प्राचार्य सुनील जवंजाळ, विद्या विकास विद्यालय, कोलवड ता. बुलडाणा.