कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू पाहता गडकरींनी पुढाकार घेत शक्य ती मदत पुरवित आहेत. या अनुषंगाने काही अडचणी असल्यास कळविण्याबाबत आवाहनदेखील गडकरींनी केले होते. त्यानुसार येथील रस्ते विकास महामंडळाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता बाळासाहेब ठेंग यांनी डॉ. विष्णू भगवान खेडेकर यांच्या श्री गजानन हॉस्पिटलला ऑक्सिजन कन्सेट्रेटर मशीनची नितांत गरज असल्याची माहिती गडकरींना दिली होती. याची दखल घेत गडकरी यांनी तातडीने या हॉस्पिटलसाठी १० ऑक्सिजन कन्सेट्रेटर मशीन उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती डॉ. खेडेकर यांनी दिली आहे. या मशीनद्वारे हवेतून ऑक्सिजन तयार करून रुग्णांना पुरविण्यात येतो. ऑक्सिजन कन्सेट्रेटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून या उपलब्धीबद्दल डॉ. विष्णू व डॉ. अदिती खेडेकर या डॉक्टर दाम्पत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.
यापूर्वीही दिला मदतीचा हात
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीही येथील हेगडेवार रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरला कृत्रिम श्वसन यंत्रे दिली आहेत. त्या पश्चात आता १० ऑक्सिजन कन्सेट्रेटर उपलब्ध करून दिले असल्याने कोरोना काळात गडकरींकडून सुरू असलेल्या या कार्याचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.