सदानंद सिरसाट खामगाव : विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये व्यापलेल्या खारपाणपट्ट्याने या भागातील शेतीची मोठी समस्या आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील पथदर्शी प्रकल्प यशस्वी होत असून त्याद्वारे खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाची समस्या निकाली निघणार आहे. त्यामुळे या भागातील दुष्काळी चित्र बदलणार असल्याचा विश्वास देशाचे रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला.
खामगाव येथे राष्ट्रीय महामार्गाच्या शेळद ते नांदुरा दरम्यानच्या रस्ता चौपदरीकरणाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार ॲड. आकाश फुंडकर, आमदार सर्वश्री राजेश एकडे, प्रकाश भारसाकळे, वसंत खंडेलवाल, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, माजी आमदार चैनसुख संचेती उपस्थित होते.
यावेळी ना. गडकरी यांनी खारपाणपट्ट्यात सिंचन वाढवण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे यशस्वी झालेल्या पथदर्शी प्रकल्पाचा उल्लेख केला. हा उपक्रम यशस्वी होत आहे. त्यातून ३०० हेक्टर जमिनीचे गोड्या पाण्याने सिंचन होणार आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील एक हजारापेक्षाही अधिक गावे खारपाणपट्ट्यात आहे. त्या परिसरातील खारपाणपट्टा नष्ट केला जाणार आहे. त्यातून शेतीचे सिंचन वाढणार असल्याचे सांगितले.
सोबतच खाऱ्या पाण्यातील झिंग्याचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतल्यास प्रतीहेक्टरी ५० लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास या उपाययोजना उपयोगी आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बुलढाणा जिल्ह्यासह खामगाव, मलकापूर मतदारसंघात विविध विकासकामांना मंजुरी दिल्याची घोषणाही त्यांनी केली.
- जाधव यांच्या मागण्यांचे पुढे पाहू...यावेळी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी विविध मागण्या मांडल्या. त्यामध्ये वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प पैनगंगेपर्यंत वाढवणे, लोणार सरोवराच्या ठिकाणी पर्यटनासाठी कोणत्याही सुविधा नाहीत, त्या उपलब्ध करणे, खामगाव-जालना रेल्वेमार्गातील अडथळ्यांबाबत अवगत केले. त्यावर ना. गडकरी यांनी याबाबत पुढे पाहू, असे भाषणातून सांगितले.