डोणगाव : स्थानिक रहेमत नगर, महालक्ष्मी नगर, खंडोबा परिसरात ८ महिन्यांअगोदर अर्धवट खडीकरण करण्यात आले हाेते. याबाबत जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी रस्त्याचे काम अर्धवट करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या कामाच्या चाैकशीचे आदेश निघताच २७ एप्रिल राेजी या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला हाेता. हा मुरूम अवैधपणे टाकणाऱ्यांवर अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही.
डाेणगाव येथील रहेमत नगर, महालक्ष्मी नगरातील रस्त्याची कामे आठ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली हाेती. मात्र, कंत्राटदाराने ही कामे अर्धवट केल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत हाेता. याविषयी शैलेश सावजी यांनी जिल्हा प्रशासनाकडे या रस्त्याची तक्रार करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी हाेती. त्यांच्या निवेदनाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने या रस्त्यांच्या कामाची चाैकशी करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानंतर या रस्त्यावर २७ एप्रिलला अचानक सदर मुरूम टाकण्यात आला. हा मुरूम काेणी टाकला याची माहितीच मिळाली नाही. तसेच या मुरुमाची रॉयल्टी नसल्याचे उघड झाले. याबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे यांनी हा मुरूम ग्रामपंचायतीने रस्त्यावर टाकला नसल्याचे सांगितले. तलाठी यांनी २८ एप्रिल राेजी पंचनामा केला असता १०० ब्रास मुरूम ग्रामपंचायतीने रस्त्यावर टाकला असल्याचे दिसून येते, असा उल्लेख केला हाेता. त्यावर तहसीलदार आता काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, महिनाभराचा अवधी झाल्यानंतरही तहसीलदारांनी आजपर्यंत कारवाई केलेली नाही. त्यामुळे २३ मे राेजी शैलेश सावजी यांनी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.