सिंदखेड राजा पालिकेमध्ये एकूण १७ सदस्य आहेत. पालिकेचे उपनगराध्यक्षपद हे भाजपच्या नंदाताई मेहेत्रे यांच्याकडे आहे. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न ज्याप्रमाणे आहे, त्याचप्रमाणे सिंदखेड राजा पालिकेमध्येही तो राबविला जावा, अशी भूमिका पालिकास्तरावरील नेत्यांनी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. दोन वर्षांपूर्वी सिंदखेड राजा पालिकेत शिवसेना सत्तेत आली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्याच मदतीने भाजपच्या नंदाताई मेहेत्रे यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली. पालिका निवडणुकीचा दोन वर्षांचा कार्यकाळ आतापर्यंत होऊन गेला आहे. त्यातच राज्यात सध्या असलेला आघाडीचा पॅटर्न सिंदखेड राजा पालिकेत राबविला जावा यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रयत्न सुरू केले होते. या संदर्भात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीदेखील खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांना या संदर्भात अवगत केले होते. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या काही महत्त्वपूर्ण स्थानिक नेत्यांची या संदर्भातील भूमिका जाणून घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीदेखील एक बैठक घेतली होती. त्याच वेळी पालिकेतील ही आघाडी होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते.
दरम्यान, सोमवारी या संदर्भातील अविश्वास प्रस्ताव नगराध्यक्ष सतीश तायडे यांच्याकडे देण्यात आला असून, या प्रस्तावावर शिवसेनेचे सात, तर राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांनी सह्या केल्या आहेत. येत्या १० दिवसांत या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी पालिकेची विशेष सभा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या या विशेष सभेकडे सध्या सिंदखेड राजातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.