बुलडाणा: कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु असताना ७१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. मात्र या वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे रविवारी प्राप्त झालेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. तर सोमवारी खामगाव येथील तीन जणांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात 'नो कारोना' अशी स्थिती असून नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातील अलगीकरण कक्षात दाखल इंडोनोशिया व मलेशियातील तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. १५ मार्च रोजी विदेशातील १२ नागरिक शेगाव व खामगाव येथील एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यांनी खामगाव येथील एक धार्मिक स्थळ गाठल्याचे समोर आले होते. आरोग्य विभागाच्या पथकाने या नागरिकांची तपासणी केली. त्यापैकी तिघांना ताप, सर्दी व कफाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांना खामगाव येथील अलगिकरण कक्षात(आयसोलेशन) ठेवण्यात आले होते. तर उर्वरित नऊ जणांना क्वारंटीनसाठी (विलगीकरण) बुलडाणा येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.