विवेक चांदूरकर बुलडाणा, दि. १८- राज्यातील अनेक पोस्ट ऑफिसमध्ये नोटा तपासण्याचे यंत्रच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याचा फायदा बनावट नोटा बदलविणारे अनेक जण घेत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, दहा हजार ५00 रुपये किमतीचे चलन तपासणी यंत्र खरेदी करण्यासाठी पोस्टाकडे अतिरिक्त निधी देण्यात आला नसल्यामुळे पोस्टात यंत्र खरेदी करण्यात आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या. तसेच जुन्या नोटा बँक व पोस्ट कार्यालयात बदलवून मिळणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे नागरिकांची नोटा बदलविण्यासाठी बँक व पोस्टाच्या कार्यालयात झुंबड उडाली. पोस्टाचे अधिकारी व कर्मचार्यांना याबाबत पुसटशी कल्पनाही नव्हती. त्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पोस्टाचे मुख्य पोस्ट कार्यालय, उप पोस्ट कार्यालय व गावांमध्ये शाखा कार्यालय असतात. यापैकी मुख्य कार्यालय व उप कार्यालयात नोटा बदलविण्यात येत आहे. आता अचानक गर्दी वाढली व नागरिकांनी लाखो रुपये जमा केले. या नोटा मोजण्याकरिता पोस्टाच्या अनेक कार्यालयांमध्ये नोटा मोजणारे यंत्रच नाही आहे. बनावट नोटा चलनातून बाद व्हाव्यात याकरिता प्रधानमंत्र्यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र पोस्ट कार्यालयात चलन तपासणी यंत्र नसल्यामुळे बनावट नोटा पोस्टात जमा झाल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. काही कार्यालयांमध्ये १५ नोव्हेंबर रोजी नोटा मोजण्याचे यंत्र खरेदी करण्याची ऑर्डर देण्यात आली असून, आता त्यांना यंत्र मिळत आहे. तर काही कार्यालयात अजूनही यंत्र नसून, कर्मचारी हातानेच नोटा मोजत आहेत. ही नामी संधी बनावट नोटा असलेल्या नागरिकांसाठी चालून आली आहे. त्यामुळे पोस्टाच्या माध्यमातून बनावट नोटा बदलवून नवीन नोटा घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. -यंत्र खरेदीसाठी अतिरिक्त निधी नाहीच नोटा मोजण्याकरिता यंत्र खरेदी करण्याची मागणी काही कार्यालयाच्यावतीने वरिष्ठांकडे करण्यात आली. नोटा मोजण्याचे यंत्र १0 हजार ५00 रुपयांचे असून, हे खरेदी करण्यासाठी खात्याच्यावतीने कार्यालयाला कोणताही अतिरिक्त निधी देण्यात आला नाही. पोस्टाच्या कार्यालयाला दरवर्षासाठी ठरावीक निधी देण्यात येतो. या निधीतूनच काही कार्यालयांनी नोटा मोजण्याचे यंत्र खरेदी केले आहे. तर काही कार्यालयांनी अजूनही यंत्र खरेदी केले नसून, कर्मचारी हातानेच नोटा मोजत आहेत. -नोटांचे नंबर लिहून ठेवण्यामुळे विलंब नोटा मोजण्याचे यंत्र पोस्टाकडे नाही. त्यातच बनावट नोटा बदलवून घेण्याची शक्यता असल्यामुळे पोस्टाच्या कर्मचार्यांनी नोटा बदलविणार्याचे नाव व नोटांचा नंबर लिहून ठेवण्याला सुरुवात केली आहे; मात्र प्रत्येक नागरिकाचे नाव व नोटांचा नंबर लिहावा लागत असल्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. तसेच दुसरीकडे नोटा बदलण्याला विलंब लागत असल्यामुळे रांगेतील नागरिकही त्रस्त होत आहेत.
पोस्टांमध्ये बनावट नोटा तपासण्याचे यंत्रच नाही!
By admin | Published: November 19, 2016 1:52 AM