या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील फळाला आता चांगली मागणी येणार असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. इंग्रज जाऊन ७५ वर्षांचा कालखंड लोटला असतानाही इंग्रज कालीन परंपरा आपल्या देशात अजूनही राबविल्या जातात. त्यातलीच एक परंपरा म्हणजे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असो, त्यामध्ये केक कापून आनंद उत्सव साजरा करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेली आहे. केक तयार करत असताना, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सचा वापर दुकानदार व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात करतात. त्या केकची किंमतही १०० रुपयांपासून अधिकच आहे. त्यामुळे आर्थिक लूट तर होतेच, परंतु केक खाल्ल्यानंतर त्यामध्ये असलेल्या केमिकलयुक्त पदार्थांमुळे माणसाच्या आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम होतो. याचीच दखल घेत, अनेक शेतकरी ग्रुप सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाले असून, सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या फळांना पाहिजे त्या प्रमाणात मागणी नाही. ‘शेतकरी जगला, तर देश जगेल’ म्हणून शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेल्या फळांना कापून व उपस्थितांना फळे वाटून जर वाढदिवस साजरा केला, तर फळांची मागणी वाढून शेतकरी आर्थिक सधन होतील. नागरिकांचे आरोग्यही यामुळे सुधारेल. यासाठी प्रत्येकाने जर वाढदिवशी शपथ घेतली की, मी केक कापून नाही, तर फळे कापून माझा वाढदिवस साजरा करेन व शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावेन, तर शेतकरी नक्कीच आत्मनिर्भर होईल. या संदर्भात सध्या सोशल मीडियावर संदेश व्हायरल करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतात पिकविलेले फळ हे आरोग्यवर्धक व शक्तिवर्धक असते. त्यामधून माणसाच्या शरीरासाठी आवश्यक असलेले अ जीवनसत्व व सी जीवनसत्व हे घटक मिळतात. मिनरलही मोठ्या प्रमाणात शरीरासाठी मिळतात. त्यामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होऊन आजाराचे प्रमाण कमी होते. उलट केकमध्ये असलेल्या केमिकलमुळे माणसाच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी घेतलेला हा निर्णय आरोग्याच्या व आर्थिक दृष्टीने हितकारक आहे.
- डॉ.सुभाष खुरद, बालरोग तज्ज्ञ, मेहकर