बुलडाणा : धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत ज्या विहिरी पूर्ण झाल्या आहेत, त्या विहिरींवर विजेचे कनेक्शन लावायचे असेल, तर सदर विहिरीपर्यंत विद्युत पोल उभारण्याची जबाबदारी ही वीज कंपनीची आहे. या पोलचे पैसे शेतकर्यांनी देण्याची गरज नाही, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी शुक्रवारी सांगितले. सदर विहिरीवर वीज जोडणी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वीज कंपनीला स्पष्ट निर्देश दिले आहेत. बुलडाण्यात १३ हजार धडक विहिरींचे नियोजन होते. त्यापैकी ७ हजार १६0 विहिरी पूर्ण झाल्या असून, या विहिरींना वीजजोडणी देण्याबाबत आता प्रशासनच पुढाकार घेत आहे. संबंधित शेतकर्यांनी केवळ ३ हजार ५00 रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार असून, प्रती हार्स पॉवर ५00 प्रमाणे शुल्क द्यावे लागणार आहे; मात्र पोल उभारणीसाठी कुठलीही रक्कम घेतली जाणार नाही. संबंधित वीज कंपनीकडून पोलसाठी रकमेची मागणी होत असेल, तर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहनही मुधोळ यांनी केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व गटविकास अधिकार्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
वीज कनेक्शनसाठी पोलचे पैसे भरण्याची गरज नाही
By admin | Published: April 18, 2015 2:03 AM