लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गरोदरपण व बाळंतपणात माता मृत्यूचे प्रमाण रोखण्याकरिता आरोग्य विभागाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात सन २०२०मध्ये एकाही गर्भवती महिलेचा मृत्यू झाला नाही. तज्ज्ञ डाॅक्टर आणि साेयीसुविधा उपलब्ध करून दिल्याने गर्भवती महिलांना अन्य ठिकाणी उपचारासाठी पाठविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गरोदर असताना किंवा प्रसूतीवेळी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याबाबत जागृती नसणे, रुग्णालयात नेत असताना वाहनाची सोय नसणे आणि रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होणे, रुणालयात गेल्यानंतर उपचाराला विलंब होणे, तयारी नसणे किंवा रक्त, शस्त्रक्रियेची वेळेवर सुविधा न मिळणे, ही माता मृत्यूची प्रमुख कारणे आहेत. गरोदरपणात, गर्भपात करतेवेळी किंवा बाळंतपणात रक्तस्त्राव होणे, जंतूदोषामुळे शरीरात गंभीर आजार होणे, अडलेले बाळंतपण, झटके, अतिरक्तदाब, गर्भपात, दूषित गर्भपात, हिवताप, रक्तपांढरी या कारणांमुळेही मातांचे मृत्यू होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. दरम्यान, बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुणालयात २०२० साली १ हजार ९१५ नॉर्मल तर ८५८ महिलांची सीझर डिलिव्हरी झाली. एक वर्षापूर्वी रक्ताचे प्रमाण कमी असणे व इतर कारणांमुळे गर्भवती महिलांना अकाेला येथे उपचारासाठी पाठविण्यात येत असे. मात्र, गत काही महिन्यांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात सुविधा वाढविण्यात आल्याने अन्यत्र पाठविण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात सुविधा वाढविण्यात आल्याने गर्भवती महिलांना अन्य रुग्णालयात पाठविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वर्षभरात १ हजार ९१५ गर्भवतींची नाॅर्मल आणि ८५८ महिलांची सिझर डिलिव्हरी झाली आहे. तज्ज्ञ डाॅक्टरांची संख्या वाढविण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्येही सिझर डिलिव्हरीची साेय करण्यासाठी आराेग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.
डाॅ. नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक
माता मृत्यूसाठी रक्तदाब, रक्तस्त्राव प्रमुख कारण
माता मृत्यूंमध्ये अधिक किंवा अत्यंत कमी रक्तदाब असणे, प्रसूतीदरम्यान अधिक रक्तस्त्राव होणे ही कारणे प्रमुख मानली जात आहेत. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यादृष्टीने व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. भूलतज्ज्ञही वाढविण्यात आले आहेत. २४ तास तज्ज्ञ डाॅक्टर उपलब्ध राहतील, असे नियाेजन करण्यात आले आहे.
नाॅर्मल डिलिव्हरी
१,९१५
सिझर डिलिव्हरी
८५८
माता मृत्यू
००