कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून, ‘डेल्टा प्लस’च्या निमित्ताने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. तिसऱ्या लाटेच्या भीतीपोटी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिक लसीकरणाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोविड लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढताना दिसून येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत शासकीय लसीकरण केंद्रासोबतच खासगी लसीकरण केंद्रांमध्येही लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येते. मात्र, जिल्ह्यात नागरिकांची गर्दी शासकीय लसीकरण केंद्राबाहेर दिसून येते. क्वचितच नागरिक लस घेण्यासाठी खासगी लसीकरण केंद्रात पैसे देऊन लस घेत असल्याचे चित्र दिसून येते.
म्हणून शासकीय केंद्रांना प्राधान्य
राज्यात काही ठिकाणी नागरिकांना बनावट लस देण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीती, तसेच अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे बुहतांश लोक शासकीय लसीकरण केंद्रांमध्येच लस घेण्यास प्राधान्य देत असल्याच्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बुलडाण्यातील लसीकरण मोहिमेचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यात आले आहे. नागरिकांना सहज लसीचा डोस उपलब्ध होऊ लागला आहे.
खासगी लसीकरण केंद्रामध्ये केवळ कोविशिल्ड लस उपलब्ध आहे, तर शासकीय लसीकरण केंद्रामध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी उपलब्ध आहेत.
आतापर्यंतचे लसीकरण
पहिला डोस ५०६६०३
दुसरा डोस १४९५५४
कोविशिल्ड ५०३०९९
कोव्हॅक्सिन १५३०५८