सिंदखेडराजा : आत्मविश्वास असल्यास कोणतेच काम अपूर्ण राहत नाही. त्यामुळे संपूर्ण विश्वासाने कामे करा असा सल्ला नियोजन मंडळाचे सदस्य ॲड. नाझरे काजी यांनी येथे बोलताना दिला. सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या नवीन प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रशासक म्हणून प्रा. मधुकर गव्हाड यांची नियुक्ती झाली असून १६ प्रशासक निवडण्यात आले आहेत. या नवनियुक्त प्रशासकांना सत्कार व पदग्रहण कार्यक्रमाप्रसंगी काजी बोलत होते.
बाजार समितीसमोर अनेक समस्या आहेत. परंतु कारभाऱ्यांनी प्रत्येक दिवस हा आपल्या कामाचा शेवटचा दिवस आहे असे समजून काम केल्यास कोणतेच काम अवघड राहत नाही.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष एकनाथ चौढरी, विश्वंभर आप्पा खुरपे, विजय तायडे, शिवाजी राजे, राजेंद्र अंभोरे, सीताराम चौढारी, सतीश काळे, सतीश सरोदे आदींची उपस्थिती होती.
मूगाला आठ हजार रुपयांचा भाव
नवीन प्रशासकांनी नियुक्ती होताच सध्या बाजारात आवक असलेल्या मूगाला बाजार समितीने ८ हजार रुपये क्विंटलचा भाव दिला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़