लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील दीड हजार गुन्हेगारांना अजामिनपात्र वॉरंट बजावण्यात आले असून दोन हजार २०६ गुन्हेगरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे निवडणुका निर्भय व पारदर्शक वातावरणात पारपडावी यासाठी एक हजार ९७९ मतदान केंद्रावर पाच हजार पोलिस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी गौरी सावंत यांनी १६ एप्रिल रोजी प्रचार तोफा थंडावल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.दरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्यांपैकी काहींना इंरिम बॉन्ड व काहींकडून फायनल बॉन्ड लिहून घेण्यात आले अहोत. ८३६ जणांचा यात समावेश असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले. दुसरीकडे ५६३ शस्त्र परवाना धारकांपैकी ५०६ जणांची शस्त्रे जमा करण्यात आली असून उर्वरित व्यक्ती हे बँकिंग तथा तत्सम क्षेत्रात कार्यरत असल्याने तेथील सुरक्षेसाठी ती जमा करण्यात आली नसल्याचेही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले.निवडणुकीच्या कालावधीत १७ दिवसांच्या प्रचारादरम्यान ९७० दारूची अवैध वाहतूक व अवैध साठवणूक करणार्यांविरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून पाच हजार ९०० लिटर दारू जप्त करण्यात आली असून जवळपास २३ लाख ५९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दहा मार्च पासून १६ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात सहा वेळा नाकाबंदी करण्यात येऊन कोंबींग आॅपरेशन करण्यात आले आहेत.यामध्ये १६ सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर यांना ताब्यात घेण्यात आले असून चार फरार आरोपीही पोलिसांच्या जाळ््यात सापडले आहेत, असे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. दरम्यान,पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान तीन हजार ७४२ वाहनांची तपासणी करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.(प्रतिनिधी)
दीड हजार गुन्हेगारांना बजावले अजामिनपात्र वॉरंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 2:47 PM