लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना लाँकडाऊनच्या काळात शैक्षणिक शुल्क वसुलीमध्ये सक्ती न करण्याचा आदेश शासनाने दिला. तरीही शिक्षण विभागाच्या निर्देशांची अवहेलना करण्याचा प्रकार कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र घडत आहे. तोच प्रकार खामगावातील एका खासगी व्यवस्थापनाच्या शाळेत घडला आहे. शुल्क न भरल्याने शाळेच्या आँनलाइन वर्गात सहभागी हाेण्यापासून रोखण्यात आले. त्याची तक्रार शिक्षण विभागाकडे केल्यानंतर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेला शुक्रवारी पत्र देत याबाबत विचारणा केली आहे. काेरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात केंद्र व राज्य शासनाने सर्वत्र लाँकडाऊन केले. त्यामध्ये लाखोंचे रोजगार गेले. बेरोजगार झालेल्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क वसुल करताना सक्ती करू नये, असे निर्देश शासनाला द्यावे लागले. त्या निर्देशाला न जुमानता खासगी शाळा व्यवस्थापनांनी शुल्क वसुली सुरूच ठेवली आहे. त्यासाठी पालक, विद्यार्थ्यांवर विविध प्रकारे दबाव टाकण्यात आला.
माजी सैनिकालाही त्रासएका माजी सैनिकाला असाध्य आजार आहे. त्यामुळे पाल्याला खामगावात शिकवणे शक्य नाही. त्यासाठी शाळेतून दाखल्याची मागणी केली. मात्र, २२ हजार रूपये भरल्याशिवाय दाखला मिळणार नाही, अशी भूमिका शाळेने घेतल्याने माजी सैनिकही हतबल झाला आहे. तर एका माजी सैनिकालाही न सोडण्याचा कंरटेपणा शाळेकडून सुरू आहे.