सिंदखेड राजा : नगरपालिकेच्या उपाध्यक्ष नंदाताई मेहेत्रे यांनी अखेर आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा ७ जून राेजी नगराध्यक्षांकडे दिला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नगरसेवकांनी मेहेत्रे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला हाेता. तसेच त्यावर ८ जून राेजी विशेष सभा बाेलावण्यात आली हाेती. या सभेपूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नगरपालिका उपाध्यक्ष मेहेत्रे यांच्याविरुद्ध अविश्वास असल्याचे पत्र नगराध्यक्ष सतीश तायडे यांना सोपविले होते. या पत्रावर दोन्ही पक्षांच्या १५ नगरसेवकांच्या स्वक्षऱ्या आहेत. अविश्वास ठराव पारित करण्यासाठी १० दिवसांच्या आत विशेष सभा घेणे बंधनकारक असल्याने मंगळवारी पालिकेची ही विशेष सभा होणार होती. मात्र, त्या पूर्वीच उपाध्यक्ष नंदाताई मेहेत्रे यांनी आपला राजीनामा अध्यक्षांकडे सोपविला आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नंदाताई मेहेत्रे यांनी अविश्वास आणण्यासाठी आपल्यावर लावलेले आरोप खोडून काढले असून भाजप, शिवसेना युतीचा फॉर्म्युला मोडीत काढून स्वार्थासाठी ही आघाडी झाल्याचे म्हटले आहे. विकासकामात अडथळे आणून सातत्याने तक्रारी केल्याचा आरोप उपाध्यक्ष यांच्यावर लावण्यात आला होता. यासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना मेहेत्रे यांनी चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या विकासकामांवर अंकुश राहावा यासाठी आपण काही सूचना करीत होतो, असे म्हटले आहे. माझे पती विष्णू मेहेत्रे व आपण या पुढेही जनतेची प्रामाणिक सेवा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आ. तोताराम कायंदे, विष्णू मेहेत्रे यांच्या उपस्थितीत पालिका कार्यालयात त्यांनी आपला राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे पालिकेची उद्या होणारी सभा आता रद्द होणार आहे. पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी पक्षाकडून उपाध्यक्ष पदासाठी नाव दिले जाणार असून त्या निवड प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.