चिखली : चिखली पालिकेचे मुख्याधिकारी पालिकेत उपस्थित राहून काम करण्याऐवजी आपल्या बंगल्यात बसूनच सर्व कामकाज पाहत असल्याचा आराेप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी कार्यालयास बेशरमाची फुले व पानांचे तोरण घालून तीव्र निषेध नोंदविला आहे. दरम्यान, याबाबत तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी वायकोस हे गेल्या काही दिवसांपासून सतत गैरहजर राहून घरबसल्या मनमानी कारभार करीत आहेत, त्यामुळे शहरात नागरी समस्या वाढल्या आहेत. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. दरम्यान, याबाबत दूरध्वनीवरून संपर्क साधूनसुद्धा मुख्याधिकारी समस्येसंदर्भाने साधी चर्चा करण्यासदेखील टाळाटाळ करीत आहेत. आपल्या निवासस्थानावरूनच नगर परिषदेचा कारभार मनमानी पद्धतीने चालवीत आहेत. कोणतेही काम असो, सही घेणे असो त्यांच्या बंगल्यावर जावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरात नागरी समस्या भेडसावत आहेत. नालेसफाई न झाल्यामुळे शहरात डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे रोग वेगाने पसरत असून, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला असून, या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी २३ जुलै रोजी शहराध्यक्ष रवींद्र तोडकर यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी दालनाला बेशरमाच्या फुलांचे व पानांचे तोरण बांधून रोष व्यक्त केला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
या अनुषंगाने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये मुख्याधिकाऱ्यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर राहण्यासाठी आदेशित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील दिला आहे. यावेळी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद पाटील, शेखर बोंद्रे, प्रशांत डोंगरदिवे, विशाल काकडे, शेख युसूफ, प्रमोद चिंचोले, रहीम टेलर, संकेत पाटील, दीपक कदम, दिनेश शर्मा, सागर खरात, अभिजित शेळके, शुभम कापसे, बजरंग गोंधणे, इब्राहीम बारुदवाला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.