बुलडाणा : शाळेचा पहिला दिवस म्हणजे मुलांसोबतच त्या शिक्षकांसाठीही न विसरणारा असतो; परंतु कोरोनामुळे शाळेचा पहिला दिवस केवळ आठवण म्हणून राहिल्याची खंत काही शिक्षकांनी ‘लोकमत’कडे शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळेतील वर्गच नव्हे, तर मुलांचे पहिल्या दिवशी स्वागतही ऑनलाइन होणार आहे. घंटेऐवजी मोबाईलची रिंग वाजणार आहे. जिल्ह्यात २८ जूनपासून जिल्हा परिषदेसह नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित व सर्व माध्यमांच्या शाळा सुरू होत आहेत; परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही शाळा ऑनलाइनच राहणार आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवशी होणारा शाळेतील किलबिलाट ऐकायला मिळणार नाही. मुलांचा शाळा प्रवेशोत्सव व त्यांचे स्वागतही ऑनलाइनच होणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात सहभागी होता यावे, यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी प्रयत्न केल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.
असा राहणार पहिला दिवस
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शाळेच्या पहिल्या दिवशी वेगवेगळ्या शाळेला भेटी देऊन मुलांचे स्वागत करणे, त्यांना नवीन गणवेश, पुस्तके भेट देणे असा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. मात्र यंदा ऑनलाइन शाळेने यात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे त्यांच्या पथकासह शाळेच्या पहिल्या दिवशी जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासीबहुल गाव असलेल्या चारबन येथील जिल्हा परिषद शाळेत जाणार आहेत. त्यानंतर जवळपास ९० विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा ऑनलाइन वर्ग भरविण्यात येणार आहे. ज्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाइन वर्गात पालकांचाही सहभाग राहणार आहे. यावेळी मुलांचे ऑनलाइन स्वागत करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
मागील पूर्ण वर्ष घरीच बसून गेले. जो आनंद प्रत्यक्ष वर्गात बसून येतो, तो आनंद ऑनलाइन शाळेत येत नाही. या वर्षी शाळेत जावेसे वाटत होते.
पायल इंगळे, विद्यार्थिनी.
पहिल्या दिवशी शाळेत गेल्यानंतर खूप मजा येते; परंतु यंदा शाळेचा हा पहिला दिवस घरीच बसून घालवावा लागणार आहे. ऑनलाइनला तर आम्ही कंटाळलो आहोत.
जय पवार, विद्यार्थी.
काय म्हणतात शिक्षक?
शाळेचा पहिला दिवस हा मुलांसाठीच नाही, तर आम्हा शिक्षकांनाही आनंद देणारा असतो. शाळा सुरू होणार म्हटले की शिक्षकांची अगोदरपासून तयारी सुरू होते. परंतु यंदा ऑनलाइन शाळा राहणार आहेत.
संजय हिरगुडे, शिक्षक.
शाळा सुरू होण्यापूर्वी मुलांच्या स्वागताची तयारी, शाळेत पाहुणे कोण येणार याचे सर्व नियोजन करण्यातही एक वेगळाच आनंद असतो. परंतु यंदा सर्वच ऑनलाईन होणार असून कोरोनाने परिस्थिती बदलली आहे.
सुरेश हिवरकर, शिक्षक.
५१८८५३
एकूण विद्यार्थिसंख्या
१७९३३
शिक्षकसंख्या
२४७५
शाळांची संख्या