लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शैक्षणिक संस्थांना अग्निशमन यंत्रणा बसविण्यासंदर्भात सूचना दिली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शासकीय रुग्णालये आणि दवाखान्यांसोबतच शैक्षणिक संस्थांच्या ‘फायर ऑडिट’चा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला विचारणा केली असता शहरातील शैक्षणिक संस्था व पेट्रोलपंप संचालकांना नोटीस बजावल्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेता शाळा, महाविद्यालयांचे फायर ऑडिट लवकर पूर्ण करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. भंडाऱ्यातील घटनेनंतर या मागणीने जोर धरला आहे. तामिळनाडूतील कुंभकोणममधील प्राथमिक शाळेला लागलेल्या आगीमध्ये होरपळून १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने शाळांच्या फायर ऑडिटचा मुद्दा चर्चेला आला. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर सुरतमधील खासगी क्लासच्या आगीची दुर्घटनांमुळे शाळा, महाविद्यालयांमधील अग्निशमन सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.शाळा, महाविद्यलयांमध्ये अग्निशमन सुरक्षा नियमांना केराची टोपली दाखविण्यात येत असल्याने पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. शाळांच्या इमारतींचे फायर ऑडिट करून आवश्यक त्या सुरक्षा यंत्रणा अद्ययावत व कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी हाेत आहे.
दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते, हे दुर्दैवी आहे. विद्यार्थी सुरक्षेसाठी शाळांमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित असणे अत्यावश्यक असून, शिक्षण विभागाने शाळांना मान्यता देतानाच यासंदर्भातील पडताळणी करून घेण्याची गरज आहे.
- पालक, खामगाव