खामगाव: शहरातील २३ अतिक्रमकांना नगर पालिका प्रशासनाच्यावतीने नोटीस बजावण्यात आल्या आहे. तीन दिवसांच्या आत अतिक्रमण हटवून सार्वजनिक वापराची जागा खुली न केल्यास, या अतिक्रमकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमणात वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांचा श्वास कोंडल्या जात होता. रस्त्यांच्या बाजुकडील अतिक्रमणामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पालिका प्रशासनाच्यावतीने अतिक्रमण निमुर्लनासाठी नांदुरा रोडवरील सुमारे २३ अतिक्रमकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये टॉवर चौकासह शहरातून जाणार्या मुख्य रस्त्या लगतच्या चहा टपरी, पान ठेले आणि हॉटेल व्यावसायिकांचा समावेश आहे. मुख्याधिकारी डी.ई. नामवाड यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निमुर्लन अधिकारी राजू जाधव मोहन अहिर, अनंत निळे प्रकाश चव्हाण, भास्कर यांनी अतिक्रमण निमुर्लनासाठी नोटीस दिल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अनेक अतिक्रमकांचे धाबे दणाणले आहे. मात्र, अतिक्रमण निमुर्लनाची कारवाई करताना कोणताही दूजा भाव केल्या जावू नये, अशी चर्चाही दबक्या आवाजात शहरातील नागरिकांमध्ये सुरू आहे.
नगरपालिकेने दिली २३ अतिक्रमकांना नोटीस
By admin | Published: August 11, 2015 11:50 PM