बुलडाणा: जिल्ह्यात घरफोड्यांसह जबरी चोरी तथा जैन स्नॅचिंग करण्यात तरबेज असलेल्या कुख्यात गुन्हेगार आकाश हरी राठोड यास स्थानिक गुन्हे शाखेने १६ आॅगस्ट रोजी जळगाव खान्देश जिल्ह्यातील जामनेर येथून अटक केली आहे. दरम्यान, त्याच्याकडून दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. त्याच्या एका साथीदारासह त्याने बुलडाणा जिल्ह्यात जबरी चोºया तथा घरफोड्या केल्या आहेत. सोबतच पोलिसांच्या चौकशीत शेगाव आणि खामगाव येथे चैन स्नॅचिंग ही केले असल्याचे समोर आले आहे. मुळचा बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात येत असलेल्या खडकी येथील तो रहिवाशी असून जामनेर येथे गेल्या काही दिवसापासून लपून बसला होता. गोपनिय माहितीतीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जामनेर येथून ताब्यात घेतले आहे. बुलडाणा शहरात दाखल एका चोरीच्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. जिल्ह्यात अलिकडीलकाळात चोरी, जबरी चोरीच्या घटनांमध्ये वा झाली आहे. त्या पृष्ठभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी अशा चोरींच्या गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहे. त्यातंर्गत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेतंर्गत आकाश हरी राठोड (२२) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एमएच-२८-बीडी-२२५५ क्रमाकाची दुचाकी आणि गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल असा दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सध्या या गुन्हेगारास बुलडाणा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चतरकर, पोलिस उप निरीक्षक प्रदीप आढाव, पोलिस हेडकॉन्स्टेबल सुधाकर काळे, सय्यद हारूण, नायक पोलिस कॉन्सटेबल दीपक पवार, सुनील खरात, संजय नागवे, पोलिस कॉन्स्टेबल विजय सोनोने, राहूल बोरडे यांनी ही कारवाई केली.
कुख्यात गुन्हेगारास जामनेरमधून अटक; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 4:46 PM