लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पश्चिम विदर्भात यंदा खरीप हंगामामध्ये ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पीक घेण्यात आले होते. त्यामुळे यंदा मका उत्पादनही चांगले झाले आहे. सध्या हमीभावाने मका खरेदी राज्यभर सुरू झाली आहे. दरम्यान, मका खरेदीमध्ये गोदामे कमी पडल्यास खासगी गोेदामांचा आधार घेण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा सर्व शेतकऱ्यांची मका हमीभावाने विक्री होण्याचे संकेत दिसून येत आहेत. हमीभावाने शेतमाल खरेदी करताना, गोदामाची कमतरता, बारदाण्याचा अभाव यासारख्या अनेक अडचणी समोर येतात. त्यामुळे अनेक वेळा खरेदी प्रक्रिया बंद होते. शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतरही मका खरेदी होऊ शकत नाही; परंतु हमीभावाने भरड धान्य खरेदी करण्यासाठी गोदामे कमी पडल्यास आता खासगी गोदामे घेण्याच्या सूचना बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक मका उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ मिळण्याची आशा लागली आहे. शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सर्वत्र भरडधान्य खरेदी करण्यात येत आहे.यामध्ये मका, ज्वारी आदींचा समावेश आहे. मक्याचे उत्पादन पश्चिम विदर्भात ४४ हजार ३६२ हेक्टर क्षेत्रावर झालेले आहे. नोंदणी केलेल्या पूर्ण शेतकऱ्यांचा ज्या धान्यासाठी नोंदणी केलेली आहे, ते धान्य खरेदी करावे, अशा सूचना डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ११ डिसेंबर रोजी बुलडाण्यात दिल्या. त्यामुळे मका उत्पादकांना आता दिलासा मिळाला आहे. मक्यासाठी गोदामे कमी पडत असल्यास खासगी गोदामे घेण्यात येणार असून, नियमानुसार खासगी गोदामे आवश्यकता वाटल्यास अधिग्रहित करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता सर्वच शेतकऱ्यांचा मका हमीभावाने खरेदी होणार असल्याचे संकेत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक मकाअमरावती विभागामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक मका उत्पादन झाले आहे. अमरावती विभागामध्ये खरीप हंगामात एकूण नियोजनापैकी सुमारे १४२ टक्के क्षेत्रावर यंदा मका लागवड झाली होती. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात २८ हजार ३०२ हेक्टर, अकोला २५० हेक्टर, वाशिम २१७ हेक्टर, अमरावती १४ हजार ६४१ हेक्टर आणि यवतमाळ जिल्ह्यात ९५१ हेक्टर क्षेत्रावर मका उत्पादन घेण्यात आले. आतापर्यंत राज्यात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक मका खरेदी झालेली आहे.