लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पावसाळा सुरू झाला की, विविध प्रकारचे साथीचे आजार बळावतात. या साथीच्या आजारांबरोबरच कानाचे आजारही डोके वर काढतात. पावसात भिजल्याने कानात पाणी जाऊन बुरशी, बॅक्टेरियाचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो. नागरिकांना अशी लक्षणे दिसल्यास त्यांनी डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे. अन्यथा कानाला इजा पोहोचून बहिरेपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाळ्यात अनेक जण भिजण्याचा आनंद लुटतात. मात्र, पाऊस कसाही पडत असल्याने कानात पाणी जाऊन कान ओला राहण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कानात बुरशी, बॅक्टेरियाचा धोका संभवतो. पावसाळ्यात कान कोरडा ठेवणे अत्यावश्यक असते. पावसाळ्यात किंवा अन्य वेळीही आंघोळ करताना कानात पाणी न जाण्यासाठी कापूस घालून राहणे चांगले असते. कानात बुरशी, बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव झाल्यास कोणतेही औषध घालण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कानामध्ये खाज आल्यास तेल टाकणे हानीकारक असते.
काय घ्याल काळजी?
कान नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवावे. विशेषत: आंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान तातडीने कोरडे करावेत. पावसाचे किंवा आंघोळ करताना कानात पाणी न जाण्यासाठी कानात कापसाचे बोळे घालून ठेवावेत. कानामध्ये कोणत्याही प्रकारची टोकदार वस्तू घालून कान साफ करण्याचे टाळावे.
हेडफोन वापरत असाल तर तो वारंवार निर्जंतुक करून वापरला पाहिजे. कानामध्ये कोणत्याही प्रकारचे तेल टाकू नये. त्यामुळे कानात चिकटपणा राहून, कान ओलसर राहण्याचा धोका अधिक असतो. कानात बुरशी, बॅक्टेरिया झाल्यास तातडीने डॉक्टरांना दाखविणे आवश्यक आहे. कान दुखू लागल्यास किंवा पाणी येत असल्यास डॉक्टरांना दाखवावे.
पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका
पावसाला सुरुवात झाली की, अनेकांना पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्याचा मोह होतो. पावसात भिजल्यामुळे पावसाचे पाणी कानात जाण्याचा धोका अधिक असतो. कानात पाणी गेल्यास तो वेळीच कोरडा न केल्यास ओलावा तसाच राहतो. त्यामुळे कानात बरशी पकडून कान दुखू लागतो. त्यावर वेळीच उपचार न केल्यास जखम होऊन त्यातून पाणी येऊ लागते आणि त्यामुळे कानाच्या पडद्याला इजा पोहोचू शकते.
कानात गेलेले पाणी सहसा काढता येत नाही. त्यामुळे पाणी न जाण्यासाठी कान बंद ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी कानात कापसाचे बोळे घालून ठेवणे हिताचे आहे.
कापसाचे बोळे न ठेवल्यास कान कोरडा केला पाहिजे. पावसाळ्यात कानाचे विकार मोठ्या प्रमाणात उद्भवतात. त्याचे कारण कानात पाणी जाऊन तयार झालेला ओलावा हेच आहे. कानातील विकार डोळ्यांना दिसत नसल्याने डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर असते.
पावसाळ्यात कानात पाणी गेल्यास कानाच्या आतील भाग दमट राहून बुरशी पकडते. तसेच ओटीटीस एक्सटा हा आजारही होऊ शकतो. त्यामुळे कानाला इजा होऊन कमी ऐकायला येऊ शकते. काही वेळेला बहिरेपणाही येऊ शकतो. तसेच कानाचा भाग थेट मेंदूच्या जवळ असल्याने मेंदूलाही इजा पोहोचू शकते. त्यामुळे कान कोरडे ठेवले पाहिजेत. कानात बट्स न घालता कापसाची वात करून त्याने कान कोरडा करावा.
- डॉ. जे. पी. राजपूत, कान-नाक-घसा तज्ज्ञ.
कानात पाणी गेल्यास कानात ओलावा तयार होऊन बुरशी, बॅक्टेरियाचा धोका उद्भवतो. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. या हंगामात दिवसाला १० ते १५ रुग्ण उपचारासाठी येतात. पाणी गेल्याने कान ओलसर होऊन चिकटपणा तयार होतो. त्यामुळे कानात बुरशी पकडते. असे झाल्यास काही जण कानात तेल टाकतात. हे तेल आपण निर्जंतुकीकरण करून टाकत नाही. त्यामुळे ते हानीकारक ठरते.
-डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक.