बुलडाणा : नीट (नॅशनल इलिजिबिलीटी कम एंट्रेंस टेस्ट (यूजी) - २०२०) परीक्षेच्या तारखांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर परीक्षेची तारीख जाहीर झाली असून, सध्या प्रवेश पत्र काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होत असून, यंदा तालुकास्तरावरही परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत.नीटकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री यांनी नीट २०२० च्या परीक्षेच्या तारखांमध्ये सुधारणा केली आहे. नीट २०२० आता १३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी नीटबाबत अनेक घडामोडी समोर आल्या आहेत. यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे या परीक्षेवरून शैक्षणिक व राजीकय वातावरण तापले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेकवेळा परीक्षा समोर ढकलण्यात आली आली होती. सुरूवातीला ही परीक्षा मूळत: ३ मे रोजी घेण्यात येणार होती. त्यानंतर त्यात सुधारणा करून १ सप्टेंबर ठेवण्यात आली, आता १३ सप्टेंबरला ही परीक्षा होत आहे. एनईईटी २०२० ची प्रवेशपत्रे २६ आॅगस्टपासून आॅनलाइन उपलब्ध करण्यात आली आहेत. आतापर्यंत ही परीक्षा जिल्हास्तरावरच घेण्यात येत होती. परंतू यंदा प्रथमच या परीक्षेसाठी तालुकास्तरावरही केंद्र देण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग वाढत असल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास वाढू नये, यासाठी नीटसाठी तालुकास्तरावरही परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.परीक्षेच्या दीड तासापूर्वीच होणार विद्यार्थ्यांची हजेरीनीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपासून ५ वाजेपर्यंत चालणार आहे. त्यासाठी दुपारी १२.२० वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. १.३० वाजता परीक्षा केंद्राचे मुख्यद्वार बंद केल्या जाणार आहे. परीक्षेच्या दीड तासापूर्वीच परीक्षार्थींची हजेरी होणार आहे.
‘नीट’ साठी आता तालुकास्तरावर परीक्षा केंद्र ; विद्यार्थ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 1:18 PM