सुधीर चेके पाटील /चिखली (जि. बुलडाणा): 'सावधान तुम्ही सी.सी. कॅमेर्यांच्या टप्प्यात आहात' असा इशारा वजा सूचकफलक येत्या काही दिवसांत शहरात वाचावयास मिळाल्यास आश्चर्यचकित होऊ नका. कारण, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरातील विविध पतसंस्था, गणेश मंडळे व प्रतिष्ठित नागरिकांच्या पुढाकाराने लवकरच शहरावर '२४७७' तिसर्या डोळ्यांची नजर राहणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात लोकसहभागातून सुमारे ७0 सी.सी. कॅमेरे कार्यान्वित होणार असून, त्यानुषंगाने २0 सप्टेंबर रोजी शहरात यशस्वी चाचणी करण्यात आली.चिखली शहर तसे शांतताप्रिय; परंतु अलीकडे एकापाठोपाठ एक चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. या पार्श्वभूमीवर शहरात सी.सी. कॅमेर्यांची गरज ओळखून ठाणेदार विजयसिंह राजपूत व मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी पुढाकार घेऊन नागरिकांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरातील विविध पतसंस्था, गणेश मंडळांनी तत्परता दर्शवून लोकसहभाग नोंदविण्यासाठी पुढे आल्याने पहिल्या टप्प्यात १00 पेक्षा अधिक सी.सी. कॅमेरे लावण्याचे नियोजन ठाणेदार राजपूत व मुख्याधिकारी चव्हाण यांनी केले आहे.चिखली शहरातील विविध घटनांची दखल घेत चौकात व वर्दळीच्या ठिकाणी सी.सी. कॅमेरे लावण्याची संकल्पना उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी गतवर्षी मांडली होती. त्यानुसार स्थानिक व्यापारी असोसिएशनसोबत ठाणेदार राजपूत यांची बैठकदेखील झाली होती; परंतु पुढे याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही; मात्र त्यापश्चात गत महिनाभरात सराफा दुकानांसह पानमसाला विक्रीचे दुकान तसेच इतर घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शहराला सी.सी. कॅमेर्यांची गरज असल्याचे अधोरेखित झाल्याने जिल्हय़ात सर्वप्रथम लोकसहभागातून चिखली शहरात सी.सी. कॅमेरे बसविण्यात येणार आहे, हे विशेष. दरम्यान, त्यानुषंगाने ठाणेदार राजपूत व मुख्याधिकारी चव्हाण यांनी सहकारी कर्मचारी तसेच या महत्त्वपूर्ण कामात योगदान देणार्या पतसंस्थांचे प्रतिनिधी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, पत्रकारांसमवेत शहरात २0 सप्टेंबर रोजी सी.सी. कॅमेर्यांच्या कार्यप्रणालीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. शहरातील प्रमुख चौक, बसस्थानक परिसर, शाळा-महाविद्यालयीन परिसर, आठवडी बाजार व इतर गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी उच्चप्रतीचे सुमारे १00 सी.सी. कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात आले असून, यासाठी उच्च प्रशिक्षित तंत्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे तसेच यासाठी चिखली पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात येऊन शहरातील प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.
आता राहणार ‘तिस-या डोळय़ा’ची नजर!
By admin | Published: September 20, 2015 11:21 PM