- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शाळांच्या समग्र प्रगतीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना तसेच मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख यांच्यासाठी ‘निष्ठा’(‘नॅशनल इनिशिटीव्ह फॉर स्कूल हेडस् अॅन्ड टीचर्स होलीस्टीक अॅडव्हासमेन्ट)प्रशिक्षण दिले जाणार आहे.या उपक्रमांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ७५२३ शिक्षकांना प्रशिक्षण दिल्या जाईल. यासाठी जिल्ह्यात बारा केंद्र स्थापन करण्यात आले असून प्रत्येक केंद्रांवर पाच केंद्रीय साधन व्यक्तींच्या आणि १२ राज्य स्त्रोत व्यक्तींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गुणवत्ता संवर्धन आणि आनंददायी शिक्षणासाठी शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, खामगाव , शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मोताळा या बाराही तालुक्यांच्या ठिकाणी ‘निष्ठा’ बाबत प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.नांदुरा व मलकापूर तालुक्यांसाठी नांदुरा येथील प्रशिक्षण केंद्रावर निष्ठा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर हे प्रशिक्षण १९ ते २३ डिसेंबर या कालावधीत हे शिबीर आयोजित करण्यात आले असून ३० डिसेंबर पासून बुलडाणा जिल्ह्यातील बारा केंद्रांवर हे प्रशिक्षण प्रत्येकी पाच दिवसांच्या टप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजित केले आहे.
प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना!निष्ठा प्रशिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय नियोजन बैठक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा येथे संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनात पार पडली. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक एजाज खान उपशिक्षणाधिकारी प्राथमिक एस .टी. वराडे यांचेसह जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ .रवी जाधव, अधिव्याख्याता राजेश गवई, धम्मरत्न वायवळ, रविंद्र सोनुने, राजेंद्र अजगर , श्रीमती सुजाता भालेराव तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील विषय सहायक व समुपदेशक यांची उपस्थिती होती .
निष्ठा प्रशिक्षणामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांचा कृतीयुक्त सहभाग घेण्यात येईल. जिल्ह्यातील प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावर एका टप्प्यात १५० प्रशिक्षणार्थ्यांना समाविष्ट केले जाणार आहे. जिल्ह्यात हे प्रशिक्षण यशस्वी करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.- विजयकुमार शिंदेप्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा.